Nanded News: Soil conservation will get new strength
किनवट, पुढारी वृत्तसेवा : जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत राज्यातील महत्वाकांक्षी 'एक लाख जलतारा' अभियानाचा किनवट तालुक्यात बुधवारी शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन मौजे दाभाडी येथे करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी नांदेड डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जलसंधारणाच्या दीर्घकालीन नियोजनाला प्रत्यक्ष गती मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात जलतारा प्रकल्पाच्या उद्घाटनाने झाली. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी श्रमदान करून जलसंधारणाच्या कामात हातभार लावला. परिसरात सुरू असलेल्या वनराई बंधाऱ्याच्याही कामांची पाहणी करण्यात आली. जलतारा उपक्रमामुळे मृदा धूप रोखण्यासाठी, भूजल पातळी वाढीसाठी तसेच शेतीक्षेत्राच्या उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण हातभार लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जलतारा प्रकल्पांची प्रगती, रोहयोअंतर्गत पूर्ण झालेली कामे आणि पुढील टप्प्यांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर मेघा पाणलोट प्रकल्पांतर्गत नामदेव दबडे यांच्या नैसर्गिक शेती प्रकल्पाला भेट देऊन तेथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. नैसर्गिक शेतीमुळे मृदेतील सेंद्रिय कार्बन वाढ, रासायनिक अवलंबित्व कमी होणे आणि सुपीकता वृद्धिंगत होण्याचे फायदे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.
या कार्यक्रमाला तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, नायब तहसीलदार महंमद रफीक यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जलसंधारण व मृदा संवर्धनाच्या या उपक्रमाला भक्कम पाठबळ मिळाले.
जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने किनवट तालुक्यात राबविण्यात आ-लेला हा उपक्रम मृदा संरक्षण, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीला नवी ऊर्जा देणारा ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.