नांदेड

Social Welfare Hostel Nanded : वेळ बदलला; व्यवस्था नाही! समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वेळेवर जेवणच नाही

यापूर्वीही विद्यार्थ्यांनी भोजनाच्या निकृष्ट दर्जाबाबत तसेच व्यवस्थेतील त्रुटींविरोधात समाजकल्याण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती

पुढारी वृत्तसेवा

नायगाव, बाळासाहेब पांडे : समाजकल्याण विभागाच्या नायगाव येथील शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रविवारी सकाळी नाश्ता वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना दुपारी सुमारे बारा वाजेपर्यंत जेवणाची प्रतीक्षा करावी लागली. शासनाच्या नियमानुसार दोन वेळचे जेवण व नाश्ता वेळेवर देणे बंधनकारक असतानाही संबंधित यंत्रणेकडून नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

यापूर्वीही विद्यार्थ्यांनी भोजनाच्या निकृष्ट दर्जाबाबत तसेच व्यवस्थेतील त्रुटींविरोधात समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक शिवानंद मिंगीरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर भोजन पुरवठादार, गृहपाल व संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसून आला नाही.

◼️चौकशी झाली; सुधारणा मात्र अद्याप दूर

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर गृहपाल पदावर बदल करण्यात आला. तसेच चौकशी अधिकारी नियुक्त करून तपासही करण्यात आला. मात्र, चौकशीचा अहवाल व त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईचा कोणताही परिणाम विद्यार्थ्यांना जाणवत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान, वसतिगृहातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून वेळेवर व दर्जेदार भोजन मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेकदा भोजनात कडधान्य, भाजी, फळे व इतर पोषक आहाराचा अभाव असल्याच्याही तक्रारी पुढे येत आहेत.

◼️ विद्यार्थ्यांचा सवाल — जबाबदारांवर कारवाई कधी?

वारंवार तक्रारी, चौकशीचे आदेश आणि गृहपाल बदलूनही परिस्थिती 'जैसे थे'च राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. केवळ चौकशी न करता दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना वेळेवर, दर्जेदार व पौष्टिक भोजनाची हमी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. तसेच समाजकल्याण विभागाने या प्रकरणात कायमस्वरूपी उपाययोजना करून वसतिगृहातील व्यवस्थापन सुधारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT