Gambling Pudhari
नांदेड

Nanded gambling raid | मुखेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी ६ जुगार्‍यांना रंगेहात अटक करण्यात आली असून, दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत

पुढारी वृत्तसेवा

मुखेड: तालुक्यातील खरब खंडगाव शिवारात सुरू असलेल्या 'आंदर-बाहर' नावाच्या जुगार अड्ड्यावर मुखेड पोलिसांनी रात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह ८ मोटारसायकली असा एकूण ५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ६ जुगार्‍यांना रंगेहात अटक करण्यात आली असून, दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.

सुतगिरणीच्या पाठीमागे सुरू होता डाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरब खंडगाव शिवारातील सुतगिरणीच्या पाठीमागे काही जण एकत्र येऊन आंदर-बाहर नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतुरवाड व त्यांच्या पथकाने या ठिकाणी अचानक धाड टाकली.

रोख रकमेसह ८ दुचाक्या जप्त

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत जुगाराच्या साहित्यासह १३,००० रुपये रोख आणि ५,३०,००० रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली असा एकूण ५,४३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

६ आरोपींना बेड्या, २ जण फरार

या प्रकरणी एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दाजीराव बाबाराव कदम (वय ४५, रा. खरब खंडगाव), नरसिंग आनंदा गायकवाड (वय २२, रा. गोदमगाव), माधव नागोराव बेंद्रे (वय ५०, रा. खरब खंडगाव), शेख शब्बीर महबुबसाब (वय ४५, रा. खरब खंडगाव), नबी हैदरसाब सय्यद (वय ४०, रा. खरब खंडगाव) आणि बालासाहेब मियासाहेब शेख (वय ५०, रा. खरब खंडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे आरोपी झाले फरार: कारवाईदरम्यान पोलिसांची नजर चुकवून आणि अंधाराचा फायदा घेऊन १) नागेश पवळे (रा. गोणार) व २) इसाक रशिद सालुरे (रा. धामणगाव) हे दोघे जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

मुखेड पोलिसांत गुन्हा दाखल

या धडक कारवाईनंतर पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतुरवाड यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १८१/२०२६ नुसार, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा (म.जु.का.) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT