

नागाव : औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना लक्ष्य करून महागडे कार्बाइड इन्सर्ट आणि इतर साहित्य चोरणाऱ्या एका अट्टल टोळीचा कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल सुमारे साडे पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे शिरोली एमआयडीसी आणि गांधीनगर पोलीस ठाण्यांतर्गत असणारे एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. ५ जून २०२६ च्या संध्याकाळी ६:३० ते ६ जून २०२६ च्या सकाळी ९:३० वाजण्याच्या दरम्यान, शिरोली येथील 'स्काय टेक्नॉव्हिजन' व 'एस. व्ही. इंजिनिअरिंग सोल्यूशन' या कंपन्यांच्या इमारतीचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला होता. चोरांनी कंपनीतील मौल्यवान कार्बाइड इन्सर्ट, टुल्स डीव्हीआर आणि वायफाय असे साहित्य चोरून नेले होते.
घटनास्थळाची पाहणी आणि सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत असताना, पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे व महेंद्र कोरवी यांना अत्यंत खात्रीशीर गुप्त बातमी मिळाली. बातमीनुसार, या गुन्ह्यातील आरोपी चोरीचा माल विकण्यासाठी हातकणंगले गावाच्या हद्दीत पुणे-बेंगळूर महामार्गावरून एका महिंद्रा जितो गाडीने (क्र. MH-51-C-1811) जाणार होते. या माहितीच्या आधारे महामार्गावर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने १६ जून २०२६ रोजी हायवेवर सापळा लावला. संशयास्पद महिंद्रा जितो गाडी येताच पोलिसांनी ती अडवून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
१. विजय विलास गोसावी (वय २९,) २. राहुल शिवाजी गोसावी (वय २४) दोघेही, रा. गोसावी वसाहत, रुकडीवाडी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे कार्बाइड इन्सर्ट, ड्रील, इडमित, मोबाईल हँडसेट आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण २५,३६,७२३/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून, पोलीस आता त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल
पोलिसांनी केलेल्या चौकशीत खालील ३ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत:
१) शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील ११,५४,५१२/- रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे कार्बाइड इन्सर्ट (एकूण २४९८ नग)
२ ) ९,७८,५३५/- रुपये किमतीचे कार्बाइड इन्सर्ट (१२८० नग) व ड्रील्स व इडमित (एकूण १२ नग)
३ ) गांभीनगर पोलीस ठाणे हद्दीतील ४,०३,६७६/- रुपये किमतीचे कार्बाइड इन्सर्ट (एकूण ६५५ नग)
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक . आण्णासाहेब जाधव, आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, संतोष बंगे, हिंदूराव केसरे, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, गजानन गुरव, विशाल खराडे, शिवानंद मटपती, अमित राजे, महेश आंबी आणि अमित मर्दाने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे