Nanded News : साहित्यिक, शिक्षक सत्त्वहीन होत चाललेत ही धोक्याची घंटा file photo
नांदेड

Nanded News : साहित्यिक, शिक्षक सत्त्वहीन होत चाललेत ही धोक्याची घंटा

प्रसाद वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात गिरीश कुबेर यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Nanded News : Literary, teachers are becoming devoid of substance, this is an alarm bell

नांदेड, पुढारी वृत्तसेवा साहित्यिक वास्तवापासून तुटत चालले आहेत. व्यवस्थेची शाबासकी मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट झाले आहे. त्यासाठी वाट्टेल त्या खटपटी, लटपटी करण्यात त्यांना किंचितही संकोच होत नाही. साहित्यिक आणि शिक्षक हे घटक जेव्हा सत्वहीन होतात, तो समाज ऱ्हासाकडे वाटचाल करु लागतो, असे परखड मत लोकसत्ता या दैनिकाचे संपादक आणि साहित्यिक गिरीश कुबेर यांनी रविवारी (दि. १२) येथे व्यक्त केले.

प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान तर्फे साहित्य क्षेत्रातील व्यक्त्ती व पुस्तकांना दरवर्षी वाङ्ःमय पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा 'मातुश्री पद्मीनीबाई बन साधना सन्मान' लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. तर 'प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार' कवी अजीम नवाज राही यांच्या 'वळिवाच्या वेळा' या काव्यसंग्रहाला देण्यात आला. 'प्रसाद बन ग्रंथगौरव राज्यस्तरीय पुरस्कार' वसई येथील साहित्यिक संगीता अरबुने यांना त्यांच्या 'एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी या कलाकृतीला प्रदान करण्यात आला. याशिवाय हाच स्थानिक पुरस्कार 'हे बंथ समाजनिष्ठेचे' या डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकास देण्यात आला.

संपादक व लेखक गिरीश कुबेर यांनी साहित्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वास्तव व त्यात भारताचे स्थान या व्यापक विषयावर नेमकेपणाने बोट ठेवले. आपल्या उण्यापुऱ्या 35 मिनिटांच्या भाषणात त्यांनी मराठी जगतातील साहित्यिक व शिक्षकांचा घसरत चाललेला स्तर याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. आपले मत पटवून देताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची भेट व त्यातील संभाषणाचा किस्सा कथन केला. व्यवस्थेपुढे न झुकता व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या साहित्यिकांची प्रदीर्घ व तगडी परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील आजचे साहित्यिक किरकोळ फायद्यासाठी व्यवस्थेपुढे लाळघोटेपणा करतात ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा त्यांनी दिला.

आपल्या पूर्वीचे वक्ते साखरखेर्डा (जि. बुलडाणा) येथील पुरस्कारप्राप्त कवी अजीम नवाज राही यांच्या भाषणातील संदर्भ पकडत श्री कुबेर म्हणाले 1992 पर्यंत 'दहशतवाद' हा शब्द जगाला माहिती नव्हता.

दहशतवादाची संकल्पना जागतिक अर्थकारणातून आली असून आपल्या फायद्यासाठी महासत्तांनी काही नाराज व्यक्तींचे समूह तयार केले आणि ते पोसले. पुढे त्यांचे चोचले पुरवणे हाताबाहेर गेल्याने त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले. त्यामुळे ते नाराजांचे समूह पोषणकत्र्यावरच उलटले, त्याला जागतिक कथित समाजाने दहशतवाद हे नाव दिले.

विकसीत भारताचे स्वप्न आपल्याला दाखवले जात आहे. पाच ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्येचे गाजर दाखवले जात आहे; परंतु त्यावेळी जगाच्या पसाऱ्यात आपल्या देशाचे स्थान काय, हे लपवले जाते. हे गुपित उघड करण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे; परंतु ते आज व्यवस्थेचे गुलाम झाल्यासारखे लिहिताना दिसतात. यावेळी त्यांनी अमेरिकी बुद्धिवादी नोआम चोम्स्की यांचे उदाहरण दिले. व्यवस्थेचे ते कर्कश्श टिकाकार म्हणून ओळखले जातात. दरम्यान, आपला परिचय करुन देताना विचारवंत हे जे बिरुद आपल्याला लावले ते आपल्याला मान्य नाही. नरहर कुरुंदकरांच्या या शहरात स्वतःला विचारवंत म्हणवून घेण्याची माझी अद्याप पात्रता नाही हे प्रामाणिकपणे कबुल करीत असल्याचे श्री कुबेर यांनी सांगितले.

मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक व पुरस्कार प्रदानाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर डॉ. पाटोदेकर, संगीता अस्बुने यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कवी अजीम नवाज राही यांनी देखील 10 मिनिटात आपल्या भावना व्यक्त करताना कुबेरांचे आभार मानले. त्यांच्या 'अयुद्धयम' या पुस्तकाचा शेवट आपल्यावरील प्रसंगावर केल्याचे नमूद करताना त्यांच्या भावना उचंबळून आल्या होत्या.

अमेरिकेत भरलेल्या पहिल्या विश्व साहित्य संमेलनात ज्या 41 साहित्यिकांचा समावेश होता. त्यात आपलाही क्रमांक होता; परंतु आपण मुस्लीम असल्याने आणि ओसामा बीन लादेन याने अमेरिकेतील जुळ्या टॉवरवर केलेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी त्यावेळी असल्याने आपल्याला अमेरिकेने प्रवेश नाकारला. त्या प्रसंगावर कुबेरांनी आपल्या पुस्तकात भाष्य केल्याने आपला सन्मान वाढल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT