

Nanded News: Kavita Joshi's Centre's 'District Repository'
नांदेड : पुढारी वृत्तसेवा अज्ञात, अनाम विरांच्या इतिहासाचे संकलन, संयोजन करुन भावी पिढीसाठी अमूल्य ठेवा जतन करण्याचे शिवधनुष्य केंद्र शासनाने उचलले आहे. यात नांदेड जिल्ह्याच्या 'डीडीआर प्रोजेक्टच्या ब्रँड अँबेसिडर' म्हणून विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षिका कविता जोशी यांनी उल्लेखनिय योगदान दिले आहे. त्याची दखल केंद्र शासनाने सन्मानाने घेतली असून गुरुवारी (दि. २५ जून) कविता जोशी यांचा दिल्लीत समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्यलढ्यातील तसेच स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अज्ञात नायक, घटना आणि ऐतिहासिक स्थळांचा इतिहास शब्दबद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने 'डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपॉझिटरी' हा प्रकल्प सुरू केला होता. यात कविता जोशी यांना नांदेड जिल्ह्याच्या "डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपॉझिटरी' प्रोजेक्टच्या बँड अँबेसिडर म्हणून सन्मानाने सामावून घेण्यात आले होते.
कविता जोशी यांनी नांदेड, हिंगोली, परभणी तसेच बीड, लातूर, संभाजीनगर जिल्हयातील १५० पेक्षा जास्त स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्यकथा मंत्रालयाच्या पोर्टलवर पाठवल्या होत्या. त्यापैकी १३०हून अधिक कथा पोर्टलवर प्रकाशित होऊन देशातील विविध भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
कविता जोशी यांनी केवळ जुनी कागदपत्रे तपासण्याबरोबरच थेट स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकृत व प्रत्यक्ष माहिती मिळवली व हा ऐतिहासिक दस्तऐवज तयार केला.
यासोबतच जिल्ह्यातील हैदराबाद मुक्तीसंग्रामातील ऐतिहासिक घटना त्यांनी संकलित केल्या आहेत. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण कामगिरीचे कौतुक म्हणून केंद्र सरकारच्या वतीने कविता जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांच्या यशामुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२५ जून २०२६ रोजी सीसीआरटीच्या भव्य प्रांगणात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्कृति मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली येथे 'डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपॉझिटरी' (DDR) सम्मान समारोहाचे आयोजन केले होते. या समारंभात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे संयोजन करून तो भावी पिढीपर्यंत पोचवण्याचे कामात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या योगदानकर्त्या सीसीआरटी जिल्हा समन्वयक शिक्षकांना सम्मानित केले गेले.
गौरव मूर्तीना इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे (आईजीएनसीए) अध्यक्ष श्री राम बहादुर राय यांच्या हस्ते मानचिन्ह देण्यात आले. यावेळी 'सीसीआरटी'चे अध्यक्ष डॉ. विनोद नारायण इंदुरकर, समर नंदा (संयुक्त सचिव), कमलेश कुमार मिश्र (संयुक्त सचिव), राजीव कुमार (निदेशक). यावेळी केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे देखील उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कविता जोशी यांना राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले..