Nanded News: Council President furious over frequent power outages
किनवट, पुढारी वृत्तसेवा : किनवट शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून, जुनाट बीज यंत्रणा, नादुरुस्त रोहित्रे, जीर्ण तारा आणि वाकलेल्या खांबांमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याचा आरोप करीत, नगराध्यक्षा सुजाता यंडूलवार यांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देऊन वरिष्ठ स्तरावरही प्रत पाठविली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, किनवट हे दुर्गम व जंगलव्याप्त क्षेत्र असले तरी नियमित व दर्जेदार वीजपुरवठ्याच्या बाबतीत शहराकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. अनेक वर्षांपासून शहरातील बहुतांश भागात जुनी वीज यंत्रणा कार्यरत असून, थोड्याशा वाऱ्या-पावसातही बीजपुरवठा खंडित होतो. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे रोहित्रांवर अतिरिक्त ताण येऊन अनेकदा तासन्तास वीज गुल राहत असल्याने, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दर गुरुवारी देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवला जात असतानाही शहरातील वीज समस्या कायम का आहे? असा सवालही नगराध्यक्षांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागातील बीज सुविधांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असतानाही, प्रत्यक्षात आवश्यक कामे होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील अनेक ठिकाणी बीजतारा लोंबकळत असून, जुने खांब व नादुरुस्त रोहित्रांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जुने खांब, तारा व रोहित्रे तातडीने बदलण्यात यावीत, वीजवाहिन्यांवरील झाडांचा अडथळा दूर करावा, तसेच दुरुस्ती व साहित्य पुरवठ्याशी संबंधित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतांना रोहन एंगलवार, शहरप्रमुख तथा नगरसेवक प्रशांत कोरडे, नगरसेवक प्रवीण राठोड, नगरसेवक शेखर नेम्मानीवार, नगर सेवक श्रीराम नेम्मानीवार, प्रभू कोल्हे, निसार भाटी, राजू सातुरबार, शेख मुकद्दर, माजी शहरप्रमुख संतोष वेलचलवार, नागेश मंत्रीवार, किशोर बोलेनवार हे उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकान्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
महावितरणच्या मेंटेनन्सच्या दाव्यानंतरही शहरात अंधार कायम
दर आठवड्याला देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जातो, मात्र शहरवासीयांच्या नशिबी अंधार आणि खंडित बीजपुरवठाच वेत असल्याने, किनवटमधील वीज व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जुनाट यंत्रणा, जीर्ण तारा, वाकलेले खांब आणि नादुरुस्त रोहित्रांमुळे शहरातील नागरिकांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत असून, या प्रश्नावर नगराध्यक्षा सुजाता बंडूलवार यांनी महावितरण प्रशासनावर घेट बोट ठेवत कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे.
किनवटसारख्या दुर्गम व जंगलव्याप्त शहरात पावसाळ्याच्या दिवसांत बीजपुरवठा खंडित होणे ही नवी बाब राहिलेली नाही. मात्र वर्षानुवर्षे तीच समस्या कायम राहणे आणि त्यावर ठोस उपाययोजना न होणे, हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मुद्दा ठरत आहे. शहरातील अनेक भागांत आजही जुन्या वीजतारा, कालबाह्य रोहित्रे आणि धोकादायक स्थितीतील खांब अस्तित्वात असल्याचा आरोप नागरिकांकडूनही होत आहे.
विशेष म्हणजे, शासनाच्या विविध योजनांतून वीज पायाभूत Niya सुविधांसाठी निधी उपलब्ध होत असतानाही प्रत्यक्षात शहराच्या वीज व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही. परिणामी थोड्याशा वारा-पावसातही वीजपुरवठा खंडित होऊन व्यापारी, विद्यार्थी, शासकीय कार्यालये आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळा अगदी उंबरठ्यावर असताना महावितरणने तातडीने शहरातील जुनी यंत्रणा बदलणे, रोहित्रांची क्षमता वाढविणे, धोकादायक तारा व खांब बदलणे आणि वीजवाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या हटविणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा आगामी चार महिने शहरवासीयांना पुन्हा अंधार, गैरसोय आणि धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होता आहे.