Parbhani News : दगडखाणीतील स्फोटामुळे मानवतची विद्युत यंत्रणा कोलमडली; अर्धे शहर आणि १८ गावे ६ तास अंधारात

उकाड्याने नागरिक हैराण
Manwath power cut
Manwath power cut
Published on
Updated on

मानवत : मानवत तहसील कार्यालय व प्रशासकीय इमारतीच्या पश्चिमेस असलेल्या एका दगडाच्या खदानित रविवारी (दि.१२) सायंकाळी ६.४५ च्या दरम्यान स्फोटके वापरून स्फोट करण्यात आला. या स्फोटामुळे उडालेले दगड थेट वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेवर पडल्याने कंडेसरचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम म्हणून मानवत शहराचा अर्धा भाग आणि तालुक्यातील तब्बल १८ गावे सलग ६ तास अंधारात राहिली. वीज नसल्याने उकाड्याने नागरिक बेहाल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ६.४५ ते ७ च्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या पश्चिमेस सुमारे ३५० मीटर अंतरावर असलेल्या दगडखाणीत डिटोनेटरच्या साहाय्याने स्फोट करण्यात आला. या स्फोटावेळी उडालेल्या मोठ्या दगडांनी थेट ३३ केव्हीच्या वीजवाहिन्यांवर आघात केल्याने तार तुटल्या आणि मोठा विद्युत बिघाड निर्माण झाला. या घटनेमुळे महावितरणला पाळोदी, रूढी व देवलगाव अवचार या तीन सबस्टेशनचा वीजपुरवठा तातडीने बंद करावा लागला. परिणामी सावळी, सावरगाव, किन्होळा पिंपळा, मांडेवडगाव, सोनुला, भोसा, लोहारा, खरबा, करंजी, रूढी, देवलगाव अवचार, आंबेगाव यांसह एकूण १८ गावांमध्ये अंधार पसरला. यासोबतच मानवत शहरातील टाऊन-१ अंतर्गत झरी, मानोली व हत्तलवाडी या गावांचाही वीजपुरवठा खंडित झाला. औद्योगिक भागातील जिनिंग व प्रेसिंग उद्योग पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

स्फोटांना परवानगी कोणाची? प्रशासन झोपेत का?

तहसील कार्यालयाच्या अगदी जवळ इतक्या धोकादायक पद्धतीने स्फोट कसा करण्यात आला, याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले गेले का? वीजवाहिन्यांच्या जवळ स्फोट करण्यास परवानगी कोणी दिली? असे संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

महावितरणचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

एकाच स्फोटामुळे तब्बल तीन सबस्टेशन बंद पडणे, यावरून वीज व्यवस्थेची अत्यंत नाजूक आणि कमकुवत स्थिती उघड झाली आहे. योग्य सुरक्षा उपाययोजना व पर्यायी व्यवस्था नसल्याने संपूर्ण तालुका अंधारात ढकलला गेला.

तहसील प्रशासनास पत्र देणार : महावितरण

रात्री खंडीत झालेल्या विजपुरवठ्याबाबत महावितरणचे अभियंता विशाल चापके यांना कारण विचारले असता त्यांनी खदानित करण्यात आलेल्या स्फ़ोटामुळे महावितरणचे मोठे नुकसान होऊन विजपुरवठा खंडित झाल्याचे दै पुढारीस सांगितले. तसेच सोमवारी (दि.१३) याबाबत तहसील प्रसासनास याबाबत पत्र देणार असल्याचेही सांगितले.

नागरिक संतप्त; चौकशीची मागणी

६ तास वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पिण्याच्या पाण्यापासून ते उद्योग धंद्यांपर्यंत सर्व व्यवस्था कोलमडली. या गंभीर प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू ठेवून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र या घटनेने प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्दाफाश झाला आहे.

५०० मीटर परिसरात संवेदनशील ठिकाणे; मोठ्या दुर्घटनेची शक्यता

विशेष म्हणजे या दगडखाणीच्या अवघ्या ५०० मीटर परिसरात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह, न्यायालय व न्यायमूर्तींचे निवासस्थान, तहसील कार्यालय तसेच मानवत शहराला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा जलकुंभ आहे. अशा संवेदनशील ठिकाणांच्या जवळ स्फोट घडवून आणणे, ही अत्यंत धोकादायक बाब असून स्फोटाच्या हादऱ्यांचा या सर्व ठिकाणांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news