Nanded News : केळीच्या दरात मोठी घसरण; उत्पादक चिंतेत file photo
नांदेड

Nanded News : केळीच्या दरात मोठी घसरण; उत्पादक चिंतेत

दर ३१०० वरून सरासरी १३०० रुपयांवर

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Big drop in banana prices; growers worried

विशेष प्रतिनिधी

नांदेड : जून महिन्यात ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांक गाठलेल्या केळीच्या दरात जुलै अखेर मोठी घसरण झाल्याने आता केळीचे दर सरासरी १३०० रुपयांवर स्थिरावले आहेत. परिणामी नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. दरातील या मोठ्या घसरणीमुळे निर्माण झालेल्या मंदीच्या संधीचा फायदा उठवत व्यापाऱ्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना कोंडीत पकडू नये, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील राजेगोरे यांनी दिला आहे.

जूनमध्ये उच्च दर्जाच्या केळीला प्रतिक्विंटल ३१०० रुपयांपर्यंत तर तुलनेने कमी दर्जाच्या केळीला २५०० रुपये दर मिळत होता. मात्र जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात - दरात तब्बल १३०० ते १४०० रुपयांची मोठी घसरण झाली. आज उच्चतम दर्जाच्या केळीचा दर १८०० रुपयांपर्यंत आणि तर कमी दर्जाच्या केळीचा दर ११०० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. लागवड खर्च, कीटकनाशके, खतांच्या दरातील वाढ यामुळे एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला असताना आता अचानक झालेल्या दर घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

गतवर्षी अतिवृष्टी, वादळी वारे आणि रोगराईमुळे नांदेड जिल्ह्यातील पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळीचे मोठे नुकसान झाले होते. मागील ३० ते ३५ वर्षांतील सर्वात मोठ्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना यावेळी करावा लागला. दरम्यान, हवामान आधारित केळी पीकविमा सुरुवातीला नाकारल्यानंतर काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील राजेगोरे यांच्या प्रदीर्घ पाठपुराव्यामुळे गतवर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळाल्याने काही अंशी दिलासा मिळाला होता.

या पार्श्वभूमीवर यंदा चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र आता केळीच्या दरातील मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांवर आता संकट ओढवले आहे. गतवर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून या प्रश्नावर जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा मानस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला होता. मात्र अशा प्रकारची समिती गठीत होऊ शकली नाही. दरम्यान, आज केळीची वाढती आवक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावामुळे निर्यातीवरही परिणाम होत असल्याचे मत व्यापाऱ्यांचे आहे.

पिळवणूक थांबविण्यासाठी समिती गठीत करावी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केळीच्या मोठ्या प्रमाणातील घटत्या दराच्या संदर्भाने तातडीने एखादी बैठक बोलावून विधायक मार्ग काढला पाहिजे, अशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची माफक आशा आहे. जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक समिती गठीत असून त्या धर्तीवर एखादा विधायक निर्णय आपल्याकडे अपेक्षित आहे. जेणेकरून जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबू शकेल.
संदीपकुमार देशमुख बारडकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT