नांदेड

Nanded news : संजय गांधी, श्रावणबाळ व दिव्यांग योजनांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करा...

मुखेड काँग्रेसकडून आमरण उपोषणाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुखेड : संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग लाभार्थी योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मुखेड तालुक्यातील शेकडो गरजू लाभार्थ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत. हे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात यावा; अशी मागणी मुखेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मुखेड तालुक्यातील विविध योजनांसाठी अर्जदारांनी आपले प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दाखल केले आहेत.मात्र,जवळपास १ हजारांहून अधिक प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.अनेक अर्जदार गेल्या वर्षभरापासून योजनांचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आर्थिकदृष्ट्या गरजू,निराधार,दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजना महत्त्वाच्या असून, प्रस्ताव प्रलंबित राहिल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही दि. १२ सप्टेंबर २०२५ व दि. १८ मे २०२६ रोजी मुखेड शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र,अद्यापही अनेक प्रस्तावांचा निपटारा झालेला नसल्याने शहर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

प्रलंबित सर्व प्रस्तावांची तात्काळ छाननी करून पात्र अर्जदारांचे प्रस्ताव मंजूर करावेत व त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा,अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. तसेच मागणीची तातडीने दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,ओबिसी नेते विश्वनाथराव कोलमकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पाटील आरगीळे,ओबिसी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड,काँग्रेस शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,राजुभाऊ बनसोडे यांच्या स्वाक्षऱ्या असुन या निवेदनाच्या प्रती मा.खा.प्रा.रविंद्रजी चव्हाण,मा.आ. डॉ. तुषारजी राठोड,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी देगलूर तसेच संपादक, प्रतिनिधी व पत्रकार यांना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT