

धर्माबाद: तालुक्यातील बाळापूर येथे हरभरा बियाणाला कीड लागू नये म्हणून ठेवण्यात आलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ६ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोही मल्लेश डेबेकर (वय ६ वर्षे) व आराध्या मल्लेश डेबेकर (वय ४ वर्षे) या दोन्ही बहिणी ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री आपल्या आई-वडिलांसोबत घरात झोपल्या होत्या. त्याच खोलीत हरभरा बियाणाला कीड लागू नये म्हणून पोत्यामध्ये कीटकनाशक ठेवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने त्याचा परिणाम कुटुंबातील सर्वांवर झाला.
कीटकनाशकाचा प्रभाव जाणवल्याने आई-वडील आणि दोन्ही मुलींना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ च्या दरम्यान आरोही व आराध्या या दोन्ही चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला. मल्लेश डेबेकर यांना या दोनच मुली होत्या. एकाच दुर्देवी घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने डेबेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.