Nanded News: After corporators, bank members too get to enjoy a tour/excursion
विशेष प्रतिनिधी
नांदेड : विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाभरातील अनेक नगरसेवक मतदारांनी सहल-पर्यटनाचा आनंद लुटत मौजमजा केल्यानंतर आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही तालुक्यांतील सभासदांनाही सहल-पर्यटनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून गरज पडल्यास २६ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचे खरे चित्र १६ जुलै रोजी स्पष्ट होईल. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
संचालकांच्या २३ जागांपैकी १६ जागा 'अ' मतदारसंघातील प्राथमिक कृषी पतपुरवठा व वि.का. सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्थांच्या मतदार प्रतिनिधींमार्फत निवडण्यात येणार असून या मतदारसंघात काही तालुक्यात मोठी चुरस होणार आहे. या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात मतदारांची संख्या मर्यादित असल्यामुळे इच्छुक उमेदवारांवर त्यांना आपल्या बाजूने ठेवण्याची तसेच जपण्याची जबाबदारी आली आहे. मागील निवडणुकीत काही उमेदवारांनी मतदारांसाठी सहल अभियान राबविले होते. या निवडणुकीतही तोच प्रयोग होईल, असे दिसत आहे.
निवडणूक अर्जाची विक्री मंगळवारपासून सुरू झाली. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० जूनच्या दुपारपर्यंत आहे. खा. अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीचे नियोजन आधीपासूनच केले आहे. चव्हाण गटामध्ये स्थान मिळविण्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघांतील इच्छुकांमध्ये चढाओढ लागली आहे. चव्हाण आणि चिखलीकर हे दोन नेते या निवडणुकीत एकत्र येणार का, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विधान परिषद निवडणुकीच्या निमिताने उमरी तालुक्यातील गोरठेकर गट चव्हाण यांच्या निकट आला. या गटाच्या नगरसेवकांनी भाजपा उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना शत-प्रतिशत साथ दिली; पण बँकेच्या निवडणुकीमध्ये मात्र गोरठेकर गटाला दूर ठेवा, अशी भूमिका त्या भागातील चव्हाण गटाचे प्रमुख व इच्छुक उमेदवार मारोतराव कवळे यांनी आधीच स्पष्ट केली आहे. काही तालुक्यांमध्ये असे पेच आणि कटकटी असल्यामुळे तेथील मतदारांची चंगळ होण्याची शक्यता आहे.
बँकेच्या संचालक मंडळातील २३ जागांपैकी २ जागा महिलांसाठी आहेत. तसेच अन्य ५ जागा मिळून एकंदर ७ जागांसाठी चव्हाण गटाकडे इच्छुकांची संख्या भरपूर असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यात कसा तोडगा निघतो, ते पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. माजी अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, मोहन पाटील टाकळीकर, दिनकर दहिफळे या दिग्गजांसह अन्य चार माजी संचालक या निवडणुकीतून बाद झाले आहेत; पण त्यांना आपल्या जागेवर आपल्या वारसास संचालक मंडळात आणायचे आहे. त्याचेही नियोजन सुरू आहे.
बँकेची अंतिम मतदारयादी २९ मे रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतील मतदारांची एकूण संख्या १३४३ इतकी होती. त्यानंतर काही प्रकरणे उच्च न्यायालयात गेली. त्यावरील सुनावणीनंतर काही तालुक्यांतील मतदार घटले किंवा वाढले आहेत.