

संजीव कुळकर्णी
नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी 4 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांतून सव्वाशेहून अधिक आक्षेप दाखल झाल्यानंतर सर्व आक्षेपांवरील सुनावणी लातूर येथील विभागीय सह निबंधकांच्या कार्यालयात शुक्रवारी पार पडली. या निमित्ताने या कार्यालयात राजकीय कार्यकर्त्यांसह नांदेड जिल्ह्यातील विधिज्ञांची मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला न जुमानता जिल्ह्यातील सुमारे 100 गाड्या लातूरला गेल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा बँकेचे संचालक मंडळ गेल्या महिन्यात निष्प्रभावित करून बँकेवर जिल्हा उप निबंधकांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह वेगवेगळ्या भागातील काही सभासदांची नावे समाविष्ट झाली नाहीत. होटाळकरांसह इतर संबंधितांनीही त्यावर विहित मुदतीत आक्षेप दाखल केला होता.
आक्षेप दाखल करण्याची अंतिम तारीख 13 मे होती. या मुदतीत 129 आक्षेप दाखल झाले. या सर्व आक्षेपकर्त्यांना शुक्रवारी लातूर येथे विभागीय सह निबंधकांच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या वकिलांना सोबत घेत सह निबंधकांसमोर आपले म्हणणे मांडले.
नायगावचे आमदार राजेश पवार यांचे नाव आलुवडगाव सेवा सहकारी सोसायटीतर्फे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले; परंतु त्यांच्या नावास विरोधी गटाने आक्षेप घेतला आहे. आ.पवार यांच्या नावाची शिफारस करणाऱ्या ठरावावर संंबंधित सोसायटीचे अध्यक्ष व सचिव या दोघांचीही स्वाक्षरी नव्हती, या मुद्यावर आक्षेप नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे त्यांच्याच गावातील काही प्रमुख कार्यकर्ते लातूरला हजर होते.
होटाळकर यांच्याप्रमाणेच अर्धापूर येथील किशोर देशमुख, किनवटचे आमदार भीमराव केराम व अन्य काही प्रमुखांची नावे मतदार यादीमध्ये आली नाहीत. त्यावर त्यांनीही आक्षेप नोंदविला. हे सर्वजण सुनावणीला हजर होते. जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या मुखेड तालुक्यातील काही प्रकरणांमध्ये आक्षेप नोंदविले गेले.
त्याअनुषंगाने बेटमोगरेकरही लातूरला उपस्थित राहिले. माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, माजी संचालक राजेंद्र केशवे, माहुर तालुक्यातील समाधान जाधव यांच्यासह वेगवेगळ्या भागातील सुमारे 200 ‘नांदेडकर’ शुक्रवारी लातूरला हजर राहिले.
सुनावणीची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिली. जिल्हा उप निबंधक शाहुराज हिरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम यांच्यासह अन्य संबंधित सुनावणी प्रक्रियेदरम्यान उपस्थित होते.
प्रत्येक आक्षेपावर स्वतंत्रपणे निर्णय देण्यात येणार असून विभागीय सह निबंधकांनी त्याकरिता 25 मेपर्यंतची मुदत घेतली आहे. बँकेच्या प्रारूप मतदार यादीतील मतदारांची संख्या 1285 होती. त्यात किती वाढ किंवा घट होते, ते पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
कवळे गुरुजी गोत्यात?
उमरी तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघावर लक्ष ठेऊन मारोतराव कवळे गुरुजींनी जास्तीत जास्त सेवा सहकारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने सज्जता केल्याचे दिसत होते. याच प्रक्रियेत सिंधी सेवा सहकारी सोसायटीची 31 लाखांची थकबाकी त्यांनी स्वतःच भरली व या संस्थेला पात्र करून घेतले; पण आता त्यांच्या या कृतीवर गोरठेकर गटाने आक्षेप घेतला असून त्यावर काय निर्णय दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कृतीमुळे कवळे गुरुजी गोत्यात आल्याची चर्चा लातूर येथे होती.