Nanded News: 41 meetings with Chief Secretary regarding MP Gopchhde's demands
नांदेड, विशेष प्रतिनिधी : भाजपाचे नांदेडचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी गेल्या दोन वर्षांत राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांकडे दिलेल्या निवेदनांना संबंधितांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आता राज्याच्या मुख्य सचिवांनी १ ते ४ जून दरम्यान एक-दोन नव्हे तर तब्बल ४१ बैठकांचे नियोजन केले आहे.
गोपछडे हे राज्यसभेचे खासदार असून दिल्लीत आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून मागण्यांची निवेदने देणे आणि त्यांची प्रसिद्धी करणे हा त्यांचा परिपाठ झाला आहे. नांदेडसाठी मंजूर झालेले उपसंचालक, भूमि अभिलेख हे कार्यालय आपल्या पाठपुराव्यामुळेच मंजूर झाले, असा दावा त्यांनी गेल्या आठवड्यात केला होता; पण त्यातील फोलपणा 'पुढारी'ने समोर आणला. त्यावर गोपछडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्यांनी नांदेडच्या स्टेडियमच्या कामासाठी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे ४०० कोटींची मागणी केल्याचे निवेदन समोर आले होते.
या ताज्या घडामोडींनंतर गोपछडेंच्या राज्य शासनाच्या विविध खात्यांशी संबंधित प्रलंबित विषयांवर मुख्य सचिवांनी चार दिवस संबंधितांच्या बैठका आयोजित केल्याची माहिती मुंबईतून समोर आल्यानंतर प्रशासनातील जाणकार अवाक् झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पूर्वी काम केलेल्या एका ज्येष्ठ पत्रकारानेच गोपछडेंच्या वरील करिष्म्याची माहिती समोर आणली आहे.
२०२४ साली राज्यसभेवर गेलेल्या गोपछडे यांनी गेल्या सव्वादोन वर्षांत राज्य शासनाच्या गृह, आरोग्य, महसूल व इतर विभागांकडे वेळोवेळी निवेदने दिली; पण कोणाकडूनही साद-प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी आपली कैफियत मुख्यमंत्र्यांसह मुख्यसचिवांकडेही मांडल्यानंतर आता १ ते ४ जून दरम्यान राज्याच्या मुख्य सचिवांकडे केवळ 'गोपछडे पुराण' चालणार असल्याचे वृत्त आहे.
संसदेच्या अधिवेशनांपूर्वी खासदारांची बैठक मुख्यमंत्री घेतात, अशी प्रथा आहे. पण केवळ एका खासदाराच्या मागण्यांसाठी मुख्य सचिवांनी तब्बल ४१ बैठका आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे सांगण्यात आले.