

संजीव कुळकर्णी
नांदेड ः नांदेड मनपाच्या श्री गुरू गोबिंदसिंघजी स्टेडियमचे आधुनिकीकरण तसेच नुतनीकरणाचे काम 2025-26 या वर्षात पूर्ण होईल, अशी घोषणा विद्यमान आयुक्तांनी मागील आर्थिक वर्षात केली होती. वरील बाबींसाठी 50 कोटी रूपये खर्च करण्यात आले; पण आता स्टेडियमचा विस्तार व आधुनिकीकरण यासाठी केंद्र सरकारकडे 400 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
मराठवाडा विभागातील पहिले मोठे स्टेडियम अशी नोंद नांदेडमधील या स्टेडियमच्या नावावर पूर्वीच झाली आहे. मनपाची सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाने 2007 व 2012 सालच्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये नांदेडच्या या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने होतील, अशी ग्वाही नांदेडकरांना दिली होती; पण काँग्रेसच्या सत्ताकाळात नांदेडच्या या स्टेडियमवर रणजी सामना घेता येईल, अशी व्यवस्थाही संबंधितांना करता आली नाही. आता याच स्टेडियमला आणखी सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडे एक नवा प्रस्ताव पाठविला गेला आहे.
नांदेडचे राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांच्या स्थानिक कार्यालयाने सोमवारी एक वृत्त जारी केले. त्यानुसार खा.गोपछडे यांनी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेऊन नांदेडच्या स्टेडियमचा विस्तार आणि आधुनिकीकरणासंबंधीचा 400 कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी केल्याचे वरील वृत्तात नमूद करण्यात आले. त्यानंतर यासंबंधाने मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्याकडून खातरजमा केली असता नांदेडच्या स्टेडियमसाठी मनपामार्फत 382 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त डोईफोडे गतवर्षी मनपाचे प्रशासक असताना 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प त्यांनीच सादर केला होता. स्टेडियमचे आधुनिकीकरण व नुतनीकरण वरील वर्षात पूर्ण होईल, असे जाहीर करून या स्टेडियमच्या मैदानावर प्रथम रणजी आणि नंतर आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने आयोजित करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. खा.गोपछडे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनपामध्ये चौकशी केली असता सुमारे पावणेतीन वर्षांपूर्वी मनपाने केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे एक सविस्तर पत्र पाठविले होते. त्यात सविस्तर प्रकल्प अहवालाचा संदर्भ देत स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी 442 कोटींची मागणी करण्यात आली होती.
मनपा हा जुना प्रस्ताव सोबत घेऊन खा.डॉ.गोपछडे यांनी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची नुकतीच भेट घेतली. मागील काळात मिळालेल्या निधीतून प्रस्तावित कामे करण्यात आल्याचे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले; पण हे स्टेडियम सुसज्ज व आधुनिकीकरण करण्यासाठी 400 कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यातील वेगवेगळी कामे करण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी गोपछडे यांनी केली. त्यांच्या या मागणीला मंत्री मांडविया यांनी कसा प्रतिसाद दिला, ते मात्र गोपछडे यांच्या कार्यालयाच्या वृत्तामध्ये नमूद केले गेले नाही. तसेच त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.