Naygaon Housebreaking
नायगाव : शहरातील व्यंकटेश नगर परिसरात धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली असून, प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेली तब्बल ९ लाख ७० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
माधव कौटकर हे नायगाव पंचायत समितीत कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असून ते व्यंकटेश नगर येथील मिरेवाड यांच्या घरात भाड्याने राहतात. प्लॉट खरेदीसाठी त्यांनी ९ लाख ७० हजार रुपयांची रक्कम घरात ठेवली होती. दरम्यान, २६ जून रोजी ते कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते.
२८ जून रोजी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील कपाटाची पाहणी केली असता, प्लॉट खरेदीसाठी साठवून ठेवलेली संपूर्ण रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे कौटकर कुटुंबाला मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच माधव कौटकर यांनी तात्काळ नायगाव पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली. रात्री उशीर झाल्याने २९ जून रोजी सकाळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलीस कर्मचारी माधव पवार यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून नायगाव शहर व परिसरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नायगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या धाडसी घरफोडीने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास होऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, तसेच शहरातील रात्रीची गस्त वाढवून संशयित व सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांचाही प्रभावी तपास व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.