

Nanded News: Sand found in fertilizer bag in Umri
उमरी, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाच्या तोंडावर काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजाला फसवणारा एक धक्कादायक प्रकार उमरीत समोर आला आहे. उमरी येथील एका कृषी केंद्रातून खरेदी केलेल्या खताच्या पिशवीत चक्क वाळू आणि खडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यातील कुदळा येथील शेतकरी पंडित पाटील जाधव यांनी पेरणीच्या तयारीसाठी उमरी शहरातील एका कृषी केंद्रातून खताच्या बॅग्स खरेदी केल्या होत्या. मात्र घरी जाऊन बॅग उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. खताच्या ऐवजी बॅगेत वाळू आणि खड्यांचे मिश्रण निघाल्याने शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, एकीकडे राज्यात अलनिनोचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना अशा प्रकाराचे बनावट खतांच्या विळख्यात अडकवले जात असून या प्रकाराला जवाबदार कोण? असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी कृषी विभागाने चौकशीचा दिखावा न करता संबंधित खत कंपनी, विक्रेता आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली जात आहे.