विशेष प्रतिनिधी
नांदेड ः मनपा निवडणुकीमध्ये शिवाजीनगर प्रभागातील 2 जागांसह 21 ठिकाणी भाजपाचा उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर पक्षनेते खा.अशोक चव्हाण यांनी प्रत्येक पराभूत उमेदवाराला बंद लिफाफ्यात अहवाल देण्यास सांगितले आहे.
मनपा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर खा.चव्हाण यांनी भाजपाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक शनिवारी रात्री घेतली. पराभूत झालेल्या उमेदवारांशी त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. पराभव झाला, तरी नाउमेद होऊ नका, पक्षाच्या कामामध्ये सक्रिय राहा, असा सल्ला चव्हाण यांनी या सर्वांना दिला. तसेच प्रत्येकाने आपला अहवालही द्यावा, असे चव्हाण यांनी सांगितले.
भाजपाने वेगवेगळ्या प्रभागांत एकंदर 66 उमेदवार उभे केले होते. त्यांतील 45 उमेदवार विजयी झाल्यामुळे 81 सदस्यांच्या मनपामध्ये पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले, तरी जुन्या नांदेडमधील प्रभाग क्र.12 ते 16 मधील एकही जागा पक्षाला जिंकता आली नाही. विजयाच्या आनंदात त्याकडे कोणाचे लक्ष गेले नसले, तरी प्रभाग क्र.15 मधील पराभवास पक्षाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने हातभार लावल्याची चर्चा असून दोन पराभूत उमेदवारांनी या कार्यकर्त्याची तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले.
खा.अशोक चव्हाण यांनी आपल्या शिवाजीनगर प्रभागातील चारही उमेदवारांना निवडून आणण्याचे नियोजन केले होते; पण माजी महापौर मोहिनी येवनकर व अन्य एक उमेदवार पराभूत झाल्यामुळे चव्हाण यांना धक्का बसला. शहराच्या दोन प्रभागांमध्ये भाजपाचे उमेदवार न देता तेथे अनुक्रमे ‘मजपा’ आणि एका स्थानिक आघाडीस पाठबळ देण्याचा प्रयोग अयशस्वी ठरल्यामुळे भाजपाला 50-55 जागांचे उद्दिष्ट गाठता आले नाही.
भाजपातर्फे निवडून आलेले बहुतांश नगरसेवक पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले हे एक तपाहून अधिक काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मनपात आले आहेत. त्यांचे पुत्र वीरेन्द्रसिंघ यांनी 1997 पासून सतत निवडून येण्याचा विक्रम नोंदविला आहे. या दोघांसह पक्षाच्या सर्वच विजयी उमेदवारांचे चव्हाण यांनी वरील बैठकीत अभिनंदन केले. प्रत्येकाने आपल्या प्रभागांतील प्रत्येक घरी भेट देऊन मतदारांचे आभार मानावेत, अशी सूचना सर्वांना देण्यात आली. त्यानुसार भाजपा नगरसेवकांनी घरभेटींचा उपक्रम सुरू केला आहे.
9 प्रभागांत शत-प्रतिशत भाजपा
मनपाच्या 20 पैकी 9 प्रभागांमध्ये भाजपाचे सर्व उमेदवार विजयी झाले. आजवर या पक्षाला एवढे घवघवीत यश कधीच मिळाले नव्हते. अशोक चव्हाण यांनी 2017 साली काँग्रेसचे नेतृत्व करताना 14 प्रभागांतून पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आणले होते. तो विक्रम त्यांना मोडता आला नाही. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 2 प्रभागांमध्ये सर्व उमेदवार निवडून आणता आले. तर 16 प्रभागांत या पक्षाला खातही उघडता आले नाही.