विशेष प्रतिनिधी
नांदेड ः मनपा निवडणुकीसाठी शहरामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आघाडी घेणाऱ्या भाजपाची निवडणूक प्रसिद्धी वेगवेगळ्या भागांतील इमारतींवरील फलकांमधून ठसठशीत होत असताना, मनपामध्ये आजवर सतत 24 वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसचे स्थान व अस्तित्व ‘कानावर’ असल्यागत दिसत आहे.
मनपा निवडणुकीसाठी भाजपाने वेगवेगळ्या 22 समित्या केल्या असून त्यांतील प्रचार-प्रसार समिती थेट खा.अशोक चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली काम करत आहे. भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन गेल्या आठवड्यात मोठ्या कार्यक्रमाद्वारे झाल्यानंतर काँग्रेस आणि इतर पक्षांनी आपल्या घोषणापत्रांच्या विषयात हात घातला; पण अद्याप कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा लोकांसमोर आलेला नाही.
नांदेड शहर आणि आसपासच्या भागातील अनेक मालमत्तांच्या छतांवर मोठ्या आकाराचे फलक (बॅनर) लावण्याची सोय आहे. भाजपाने या क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक प्रतिष्ठानांच्या माध्यमातून तब्बल 50 मोठे फलक लावण्याचे नियोजन आधीच केले. त्यानंतर वेगवेगळ्या इमारतींवर लागलेले, प्रचंड उंची आणि रुंदीचे फलक आता लक्ष वेधून घेत असून या फलकांतून भाजपाने नांदेड जिंकण्याचा तसेच मनपात आपली सत्ता आणण्याचा निर्धार, आपला संकल्प दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.
खा.चव्हाण यांनी पक्षाच्या प्रसिद्धीविषयक बाबींमध्ये आपली चतुरस्र प्रतिभेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवली असल्याचे सांगण्यात आले. या यंत्रणेच्या प्रमुखाने ‘आम्ही जिंकणारच’ या निर्धारास साजेशी घोषवाक्ये तयार केली आहेत. पक्षाच्या जाहीरनाम्याची मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष, मंत्री पंकजा मुंडे, माधव भांडारी, चित्रा वाघ आदी नेत्यांनी प्रशंसा केल्यामुळे स्थानिक यंत्रणेचा उत्साह वाढला आहे.
मनपाच्या मागील निवडणुकीत फलक उभारणी, जाहीरनामा प्रकाशन आदी प्रसिद्धीविषयक बाबींत काँग्रेस पक्ष सरस ठरला होता. पण या निवडणुकीमध्ये पक्षाकडे तोलामोलाचा नेता नाही, प्रभारी या नात्याने माणिकराव ठाकरे एकदा आले आणि परत गेले. या पक्षाला वरून रसद मिळालेली नाही त्यामुळे छतांवरील मोठे फलक लावण्याचा पक्षाच्या स्थानिक यंत्रणेला विचारही करता आलेला नाही.
काँग्रेस पक्षाने भाजपा-शिवसेनेच्या खालोखाल 58 उमेदवार निवडणुकीत उतरविले आहेत. या पक्षाचे व उमेदवारांचे नाव केवळ लोकांच्या ‘कानी’ गेले आहे. भाजपा उमदेवारांचे नाव वेगवेगळ्या माध्यमांतून प्रत्येक प्रभागांतील घराघरांत जात असताना, काँग्रेसचे बहुसंख्य उमेदवार हरवल्यागत झाले आहेत.