भाजपाचे कमळ गल्लीगल्लीत; इतर पक्ष मात्र दलदलीत ! pudhari photo
नांदेड

Nanded Municipal Election : भाजपाचे कमळ गल्लीगल्लीत; इतर पक्ष मात्र दलदलीत !

नांदेड मनपा निवडणूक प्रचाराच्या दहा दिवसानंतरचे चित्र ः संकल्पनामा गेला घरोघरी

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः चिखल-दलदल आणि कमळ यांचे नाते तसे नैसर्गिक. 1980 सालच्या स्थापनेनंतर भाजपाला ‌‘कमळ‌’ चिन्ह मिळाल्यानंतर संस्थापक अध्यक्षांनी या नात्याचा आपल्या खास शैलीत उल्लेख केला होता. नांदेड मनपाच्या 28 वर्षांच्या कारकीर्दीत सतत सत्तेबाहेरच राहिलेले ‌‘कमळ‌’ मनपा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रथमच गल्लीगल्लीत गेले असून भाजपाला आव्हान देऊ पाहणारे पक्ष बहुसंख्य प्रभागांत दलदलीत फसल्यासारखे झाले आहेत.

मनपा निवडणुकीसाठी गेेले 10 दिवस झालेल्या प्रचारामध्ये मुस्लिमबहूल भाग वगळता बहुतांश शहर ‌‘कमळमय‌’ झाले असून अन्य कोणत्याही पक्षांच्या तुलनेत भाजपाची यंत्रणा सक्षम असल्याचे व सर्वदूर पोहोचल्याचे तटस्थ निरीक्षकांचे निरीक्षण आहे. या निवडणुकीनिमित्त काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे गुरुवारी तर राष्ट्रवादीच्या विकासनाम्याचे प्रकाशन काल संपन्न झाले; पण त्यापूर्वीच भाजपाचा विवेचक प्रस्तावना असलेला संकल्पनामा अनेक प्रभागांमध्ये मतदारांच्या हातात विराजमान झाला होता.

भाजपाच्या शहरी भागातल्या कार्यकर्त्यांसह निमशहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्तेही वेगवेगळ्या प्रभागांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी कार्यरत झाले आहेत. प्रत्येक प्रभागातील स्थितीचा दैनंदिन आढावा घेतला जात असून प्रत्यक्ष भेटीगाठी, उमेदवारांची छापील पत्रके, छोट्यामोठ्या बैठका आणि समाजमाध्यमे यांद्वारे घरोघर कमळ पोहोचविले जात आहे. सर्वच पक्षांची वाहने वेगवेगळ्या प्रभागांत फिरत आहेत. भोंग्यांच्या माध्यमातून उमेदवारांची नाव-निशाणी सांगितली जात आहे. यांतही भाजपाने आघाडी घेतली असल्याचे दिसून आले.

20 प्रभागांतील 81 जागांपैकी 21 जागांवर भाजपाची आपल्या दोन मित्रपक्षांसह काँग्रेस उमेदवारांविरुद्धही लढत होत असून यांतील बहुसंख्य जागांवर भाजपाचे महत्त्वाचे मोहरे लढतीमध्ये आहेत. त्यामध्ये ज्योती किशन कल्याणकर व दिनेश मोरताळे (प्रभाग एक - क व ब), सतीश देशमुख तरोडेकर (दोन - ड), माजी महापौर जयश्री नीलेश पावडे, शांभवी प्रवीण साले, महेश कनकदंडे (पाच - ब, क, ड), वैशाली मिलिंद देशमुख (सहा - क), वीरेन्द्र जगतसिंघ गाडीवाले (10 - ड) यांचा समावेश आहे.

अन्य तीन पक्षांचेही काही प्रमुख उमेदवार वरील 21 जागांमध्ये लढतीत आहेत. त्यामध्ये सुहास बालाजी कल्याणकर (शिवसेना प्रभाग क्र.1), उच्चशिक्षित असलेल्या अफीया खाजी नाफे (काँग्रेस दोन - ब), ज्योती सुधाकर पांढरे (काँग्रेस पाच - ब), अविनाश राजेश पावडे (काँग्रेस दहा - ड), जिगिशा अशोक उमरेकर (नऊ - क), मुन्ना अब्बास (काँग्रेस आठ - ड) या उमेदवारांचा समावेश आहे. भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या शिवाजीनगर प्रभागासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तेथे शिवसेनेने चारही जागांवर उमेदवार उभे केले असून काँग्रेस पक्षाने या प्रभागात तीन मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे.

नांदेड-वाघाळा मनपामध्ये तसेच पूर्वीच्या नगर परिषदेमध्ये भाजपाने अतिशय कार्यक्षम, संस्कारक्षम आणि उपक्रमशील नगरसेवक दिले होते; पण मर्यादित संख्येमुळे त्यांच्या कर्तृत्वाला म्हणावा तेवढा वाव मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात भाजपाच्या संकल्पांची पूर्तता करण्यासाठी मनपामध्ये भाजपाची एकहाती सत्ता आणण्याची वेळ आली आहे. शहराचा गतिमान विकास करण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करावे.
खासदार अशोक चव्हाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT