Nanded municipal corporation pudhari photo
नांदेड

Nanded city cleanliness drive : नांदेडात मनपाचा 300 टन कचऱ्यावर प्रक्रियेचा संकल्प

स्थायी समितीचा 2026-27 साठी मोठा निर्णय : तुप्पा येथील प्रकल्पात होणार ऊर्जा निर्मिती

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिकेने घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (वेस्ट-टू-एनर्जी) करून राज्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. आता याच धर्तीवर नांदेड वाघाळा महानगरपालिकेने शहरात दररोज जमा होणाऱ्या 300 टन कचऱ्यापासून वीज किंवा बायोगॅस निर्मितीचा महत्त्वाकांक्षी संकल्प केला आहे. स्थायी समितीचे सभापती स. विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी 2026-27 च्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष निधीचे नियोजन करण्याचे संकेत दिले आहेत.

शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचा उपयोग व्हावा व महापालिकेला फायदा व्हावा यासाठी विचार केला जात होता. याच अनुषंगाने आता.कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीची संकल्पना पुढे आली आहे.त्यासाठी नांदेड पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

नांदेड शहरातून दररोज सरासरी 300 टन कचरा उचलला जातो. हा कचरा तुप्पा येथील व्यवस्थापन प्रकल्पात नेला जातो. सध्या तिथे ट्रॉमील यंत्राद्वारे ओला व सुका कचरा वेगळा करून 40 टक्के कंपोस्ट खत तयार केले जाते, तर उर्वरित आरडीएफ (रिड्यूस्ड डिराईव्हड फ्युएल) सिमेंट कंपन्यांना पाठवले जाते. मात्र, आता केवळ खतनिर्मितीवर न थांबता, फलटणप्रमाणे प्रत्यक्ष ऊर्जा निर्मिती करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून वीज किंवा बायोगॅस तयार केला जाईल. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कचरा डम्पिंग करण्याची गरज उरणार नाही, ज्यामुळे जमिनीचे प्रदूषण थांबेल. सन 2026-27 च्या नियोजनात या प्रकल्पासाठी निधीची विशेष तरतूद केली जाणार आहे.शहरातील कचरा ही आता समस्या न राहता उत्पन्नाचे साधन ठरणार आहे. फलटण पॅटर्नमुळे नांदेड महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे.

ठळक वैशिष्ट्ये

कचरा विल्हेवाट: 300 टन प्रतिदिन.

तंत्रज्ञान : वेस्ट-टू-एनर्जी (फलटण पॅटर्न).

फायदा: वीज निर्मिती व प्रदूषणमुक्ती.

अंमलबजावणी : वर्ष 2026-27 मध्ये प्रकल्पाचे नियोजन.

“फलटणसारख्या लहान नगरपालिकेने हा प्रयोग यशस्वी केला आहे, तर नांदेडला ते नक्कीच शक्य आहे. तुप्पा येथील प्रकल्पाची मी स्वतः पाहणी केली असून, आगामी काळात नांदेडकरांना कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प पहायला मिळेल. यासाठी आवश्यक निधीचे नियोजन आम्ही करत आहोत.”
स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभापती, स्थायी समिती, मनपा नांदेड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT