

Mahavitaran claims uninterrupted power supply in the city
नांदेड, पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित करून नागरिक व शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता नांदेड शहरातील वीजपुरवठा अधिक स्थिर, विश्वासार्ह व सक्षम होण्यासाठी मोठ्या उपाययोजना केल्याचे पत्रक काढून स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेण्याचा भंपकपणा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहर व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. एकदा गुल झालेली वीज पुन्हा कधी येईल याचीही शाश्वती राहिली नाही. सलग दोन दिवस शहरातील सर्वच भागाचा रात्रभर वीजपुरवठा गुल झाला होता. शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना तासन्तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक प्रचंड वैतागले आहेत. महावितरण विषयी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार महावितरणच्या प्रशासनाने केला आहे.
महावितरणच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात शहरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व अखंडित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एमएसकेव्ही वाय २.० (मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना) अंतर्गत नांदेड शहर विभागातील एकूण १७ उपकेंद्रांमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. यापैकी १४ उपकेंद्रांमधील कामे पूर्ण झाली असून उर्वरित ३ उपकेंद्रांतील कामे सध्या प्रगतिपथावर असल्याचे म्हटले आहे. तसेच निरंतर वीज पुरवठा योजना अंतर्गत २०० केव्हीए क्षमतेचे १४ व १०० केव्हीए क्षमतेचे ४ असे एकूण १८ वितरण रोहित्रे (डी टी सी) बसविण्यात आले आहेत. सचखंड गुरुद्वारा परिसरासाठी बॅकअप वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ३३ केव्ही फीडरची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यास मोठी मदत होत आहे.
तसेच एमएसकेव्हीवाय २.० अंतर्गत नेरली, वाडीपुयड, मालटेकडी, विष्णुपुरी (पांगरी) व गाडेगाव या पाच ठिकाणी नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले असून नेरली येथील उपकेंद्राचे काम सध्या प्रगतिपथावर सुरू आहे. तसेच तळणी उपकेंद्रामध्ये सोलार प्रकल्प कार्यान्वित (कमिशनड) करण्यात आला असून त्यामुळे कृषी ग्राहकांना दिवसा वीजप रवठा करणे शक्य झाले आहे.
एडीबी योजनांतर्गत नांदेड शहराभोवती रहिवासी कॉलनीची वाढ लक्षात घेता मुगट येथे नवीन उपकेंद्र उभारणे, रहाटी व तळणी येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच नाळेश्वर येथे ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ करण्याचे प्रस्तावित असल्याचेही सांगण्यात आले.
आरडीएसएस योजनांतर्गत ऑक्सफोर्ड फीडरवर पावडेवाडी या भागात कृषी फीडर विभाजन (एजी फिडर सेपरेशन) चे काम प्रगतिपथावर आहे. तसेच विविध योजनेंतर्गत चालू वर्षात एकूण ५३ ठिकाणी वितरण रोहित्रांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनांमुळे नांदेड शहरातील वीजपुरवठा अधिक स्थिर, विश्वासार्ह व सक्षम होण्यास मोठी मदत होणार असून, भविष्यातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचेही महावितरणने नमूद केले.
"गिरे तो भी टांग उपर"
अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उपाययोजना केल्याचा हा दावा सद्यपरिस्थितीत कोणीही मान्य करणार नाही. महावितरणने जारी केलेल्या या प्रसिद्धी पत्रकाच्या दिवशीही अनेक भागांत सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झालेला होता. महावितरणचे हे खोटे दावे म्हणजे "गिरे तो भी टांग उपर' असेच म्हणावे लागेल.