घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व सहकारी. pudhari photo
नांदेड

Nanded medical student death : नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृहात जीवन संपवले

नातेवाइकांचे गंभीर आरोप अन्‌‍ त्या ऑडिओ क्लिपची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : शहरातील हडको भागात होमिओपॅथीचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेने नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वाजेगाव येथील रहिवासी असलेली आकांक्षा हडको येथील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाजवळच असलेल्या एका खासगी वसतिगृहात ती राहत होती. शुक्रवारी सकाळी तिने स्वतःच्या खोलीत गळफास घेतल्याचे समोर येताच नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

राजकीय नेत्यावर आरोप; नातेवाईक आक्रमक

आकांक्षाच्या जीवन संपवण्यामागे वसतिगृह चालकाचा मानसिक त्रास असल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. संबंधित वसतिगृह चालक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक नेता असल्याचे सांगितले जाते. जोपर्यंत चालकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळाचा पंचनामा केला. “आम्ही पुराव्यांची तपासणी करत आहोत. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोषींवर कडक कारवाई केली जाईल,“ असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. मात्र राजकीय दबाव झुगारून पोलिस काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑडिओ क्लिपचा पुरावा?

नातेवाइकांच्या दाव्यानुसार, वसतिगृह चालकाने आकांक्षाला मानसिक त्रास दिल्याचे ठोस पुरावे आहेत. यामध्ये काही ऑडिओ क्लिप्सचाही समावेश असल्याचे बोलले जाते. या क्लिपमध्ये नेमके काय दडले आहे, हे तपासात समोर येईलच. मात्र या पुराव्यांच्या आधारे तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबाकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT