गोविंद सरदेशपांडे
नांदेड ः जिल्ह्यातील कृषी ग्राहक वगळून घरगुती, वाणिज्यीक, औद्योगिक, सार्वजनिक दिवाबत्ती, पाणीपुरवठा, शासकीय कार्यालय व इतर प्रवर्गासह लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील सुमारे दोन लाख 45 हजार 626 वीज ग्राहकांकडे 622 कोटी 80 लाख रुपयांची वीजबिलांची बाकी थकली असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सुमारे दोन लाख 667 वीजग्राहकांकडे 120 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच 15 हजार 419 वाणिज्यीक ग्राहकांकडे 12 केटी 47 लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच औद्योगिक वीज ग्राहक असलेल्या दोन हजार 118 ग्राहकांकडे सात कोटी 27 लखांची थकबाकी आहे. तर जिल्हाभरातील सार्वजनिक दिवाबत्ती ग्राहक असलेल्या तीन हजार 369 वीज ग्राहकांकडे 235 कोटी 2 लाखांची थकबाकी आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या दोन हजार 884 ग्राहकांकडे 137 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच जिल्हाभरातील विविध चार हजार 10 शासकीय वीज ग्राहकाकडे 9 कोटी 84 लाख तर इतर 79 ग्राहकांकडे 18 लाख रुपयांची थकबाकी आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून या थकबाकीदारांनी विजबिलांचा भरणा केलेला नाही. त्यामुळे संबंधित संस्था, शासकीय कार्यालयांसह सामान्य वीज ग्राहकांच्या वीजबिलांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या थकलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीच्या वसुलीसाठी आता महावितण प्रशासनाने कंबर असली असून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे महावितणच्या वतीने राज्यभरात नवीन ’स्मार्ट मीटर’ बसविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकणी सदरच्या मीटरमुळे जादा वीजबिल येत असल्याची ओरड ग्राहकांतून ऐकावयास मिळत आहे. त्यातच अनेक ठिकाणी सदरचे मीटर बसविण्याच्या कारणाहून वाद - विवादही सुरू असल्याची माहिती आहे.
ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्याची वल्गना जरी महावितरणच्या वतीने केली जात असली तरी, उन्हाळा सुरू होताच अनेक भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ‘लोडशेडिंग’ सुरू झाली का? असा प्रश्न आता वीजग्राहकांतन केला जात आहे.
त्याचप्रमाणे वापरापेक्षा अधिक वीजबिले येत असल्याच्या तक्रारी महाविरणकडे वीजग्राहक करीत असून जुन्या मीटरचे वीजबिल न घेताच रिडींग टाकून वीजबिल अदा केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, महावितरणच्या वतीने थकबाकीदारांसह वीजचोरी करणाऱ्याविरुध्द कडक कारवाई केली जाणार आहे.
वारंवार वीज खंडित ; ग्राहक वैतागले....
सध्या जिल्हाभरात उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे अंगाची काहिली होत आहे. अशातच आता जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने वीज ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नवीन नांदेडसह तरोडा (बु.), सह्याद्रीनगर भागात दिवसातून दोन ते तीनवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. याचाच अनुभव मंगळवारी सकाळी पाचच्या सुमारास आला. त्यामुळे महावितरणने ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.