

येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेदरम्यान व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या कमर्शियल गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी किमान 10 ते 15 दिवसांसाठी अतिरिक्त गॅस कोटा मंजूर करून सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधित निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी स्वीकारले असून, त्यासोबत देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रही जोडण्यात आले आहे.
येरमाळा येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठी पारंपरिक यात्रा भरते. या यात्रेसाठी जिल्ह्यासह राज्यभरातून अंदाजे 10 ते 15 लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे परिसरात हॉटेल, मिठाई विक्रेते, खानावळी तसेच विविध खाद्यपदार्थांचे तात्पुरते स्टॉल मोठ्या प्रमाणावर उभारले जातात. परिणामी, कमर्शियल गॅस सिलिंडरची मागणी अनेकपटींनी वाढते.
सध्या उपलब्ध गॅस पुरवठा अपुरा पडण्याची शक्यता व्यक्त होत असून, यामुळे व्यापारी व भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे यात्रेच्या कालावधीत अतिरिक्त गॅस कोटा मंजूर करून संबंधित वितरकांमार्फत तत्काळ पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्यास गॅस टंचाई टाळता येऊन भाविकांची गैरसोय टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.