नांदेड - लातूर नवीन रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार सकारात्मक : खा. चव्हाण pudhari photo
नांदेड

MP Ashok Chavan : नांदेड - लातूर नवीन रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार सकारात्मक : खा. चव्हाण

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा, रेल्वेसेवेला येणार वेग

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : मराठवाड्यातील नांदेडलातूर थेट नवीन रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे महत्त्वपूर्ण संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज घेतलेल्या भेटीत रेल्वेमंत्र्यांनी हे स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‌‘महारेल‌’मार्फत नांदेडलातूर थेट नवीन रेल्वे मार्गाचा प्राथमिक अभ्यास पूर्ण करून घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गासाठी फिजिकल लोकेशन सर्व्हे करण्यात आला आहे.

या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला अधिक गती देण्याच्या उद्देशाने खा. अशोकराव चव्हाण यांनी आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेतील कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या रेल्वे मार्गाचे महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकार सकारात्मकपणे विचार करत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी यावेळी सांगितले.हा नवीन रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यानंतर नांदेड लातूरमधील अंतर केवळ 100 किलोमीटर राहणार असून हे अंतर अवघ्या सव्वा तासात पार करणे शक्य होईल.

तसेच वर्धायवतमाळनांदेड हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर मिरज कोल्हापूर असा थेट रेल्वे दुवा निर्माण होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान होईल. त्याचप्रमाणे नांदेड व पुणे शहरातील रेल्वे अंतरातही कपात होणार आहे. या भेटीत खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेडबिदर रेल्वे मार्गाचा मुद्दाही उपस्थित केला.

हा रेल्वे मार्ग केंद्र सरकारने मंजूर केला असून महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रकल्पातील महाराष्ट्राच्या खर्चाचा हिस्सा व भूसंपादनाची जबाबदारी स्वीकारण्यास संमती दिली आहे.

मात्र कर्नाटक राज्य सरकारने अद्याप या प्रकल्पास संमती दिलेली नसल्याने तो रखडला आहे. कर्नाटक सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT