नांदेड : कपाशी आणि तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून बेकायदेशीरपणे लावलेली गांजाची शेती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केली. कंधार तालुक्यातील दिग्रस (बु.) शिवारात ही कारवाई करण्यात आली असून, ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा १० किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत गुरुवारी (ता. ८) स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिग्रस (बु.) येथील शेतशिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची गुप्त बातमी मिळाली. माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस अधीक्षकांची रीतसर परवानगी घेऊन पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी संबंधित शेतात अचानक छापा टाकला.
कपाशी आणि तुरीच्या पिकाच्या आड लपवून लावलेली गांजाची झाडे पाहून पोलीस पथकही चक्रावले. शासकीय पंच आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समक्ष गांजाची झाडे उपटून त्यांचे वजन करण्यात आले. यात १०.५ किलोग्रॅम वजनाचा ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत श्रीकृष्ण रामराव गुट्टे (वय - रा. दगडवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर, सध्या रा. भेंडेवाडी, ता. कंधार) याच्याविरोधात कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस निरीक्षक घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहूळे, उपनिरीक्षक बळीराम दासरे आणि पोलीस अंमलदार गुंडेराव करले, दिलीपकुमार चंचलवार, सुनील गट्टलेवार, देवीदास चव्हाण, मोतीराम पवार आदींच्या पथकाने ही धडक कामगिरी केली.
जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.