वाळू उपसा करणारे यंत्र व साहित्य नष्ट करताना पोलिस अधिकारी, कर्मचारी. pudhari photo
नांदेड

Nanded illegal sand mining : पोलिसांची मोठी कारवाई; गोदावरी पात्रातील 25 लाखांचे साहित्य नष्ट

5 जणांवर गुन्हे दाखल, वाळूमाफियांमध्ये खळबळ

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मी-गंगाबेट परिसरातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकून पोलिसांनी सुमारे 25 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत इंजिन व तराफे जाळून नष्ट केले आहेत.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांचे पथक 28 एप्रिल रोजी परिसरात गस्त घालत होते. पहाटे 3:10 वाजेच्या सुमारास मी-गंगाबेट येथील गोदावरी नदीपात्रात इंजिन व तराफ्यांच्या सहाय्याने अवैध रेती उपसा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पहाटे 3:30 वाजता नदीपात्रात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच रेती उपसा करणारे पाच अज्ञात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

नदीपात्रात रेती काढण्यासाठी वापरण्यात येणारे 10 लाख रुपये किमतीचे 20 तराफे आणि 15 लाख रुपये किमतीची 5 इंजिने पोलिसांना मिळून आली. हे साहित्य बाहेर काढणे शक्य नसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष जागीच जाळून व तोडून नष्ट केले. तसेच नदीकाठी साठवलेली 25 हजार रुपये किमतीची 5 ब्रास वाळू जप्त करून पोलीस ठाण्यात आणली आहे.

या प्रकरणी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता () कलम 303(2), 3(5) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकाची कारवाई

पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस हवालदार सुरेश पांचाळ, कल्याणकर, गवेंद्र सिरमलवार आणि पचार यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT