

नांदेड ः नांदेड जिल्हयात वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असल्याने पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान, शुक्रवारी सकाळी गुरुद्वारा जवळील भागात धडक कारवाई करत एका घरातून तब्बल 31 तलवारी, दोन खंजर व 10 चाकू असे 43 घातक शस्त्रसाठा जप्त करत. एकावर कारवाई केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठ दिवसांपुर्वी तीन दिवसांत पाच खुनांच्या घटना घडल्याने नांदेडच्या कायदा व्यवस्थेवर टिका होऊ लागली होती. त्यावरुन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी विविध पथके नेमून जिल्ह्यात कोंम्बीग ऑपरेशन राबवत गेल्या चार दिवसांत 88 गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी गुरुद्वारा जवळील भागात पुरुषोत्तम ग्रंथी यांच्या घरावर छापा टाकून पोलीसांनी त्यांनी विनापरवाना अवैधरित्या शस्त्रसाठा जप्त केला होता.त्यावर कारवाई केली आहे.
या कारवाईत 31 तलवारी , दोन खंजर व 10 चाकू असे 43 घातक शस्त्र जप्त करण्यात आली. शहरात गेल्या कांही दिवसांपुर्वी झालेल्या पाच खुनात केवळ तलवारी, चाकू आणि खंजरचाच वापर होता. त्यामुळे याविरोधात पोलीसांनी विशेष मोहिम राबवित ही मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गेल्या कांही दिवसांतील ही मोठी कारवाई असून, या कारवाईत स्वतः जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने,वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे यांच्यासह टिमने ही कारवाई केली.
सहा टीमकडून झाडाझडती
गुन्हेगारांवर अंकुश बसावा म्हणून विविध गुन्ह्यांत सक्रीय सहभाग असलेल्या, हद्दपारीचे गुन्हे असलेले, पॅरोलवर सुटलेले, एमपीडीए मधील आरोपींच्या घरी व त्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांची झाडाझडती घेतली यातील कांही जणांकडून कांही शस्त्रे, हद्दपार असताना ही वास्तव्य करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी सहा टिम तयार केले होते. गेल्या चार दिवसांत या टिमने अक्षरशःशहर पिंजून काढून गुन्हेगारांच्या सर्वहालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत कारवाई मोहीम हाती घेतली आहे.या कोम्बींग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.