Pusad Hardada highway road quality issues Pudhari
नांदेड

Nanded News | हायब्रिड इम्युनिटी तंत्रज्ञान नावालाच : पुसद - हरदडा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

“हायब्रिड इम्युनिटी तंत्रज्ञानाने मजबूत रस्ता” हा दावा फक्त कागदोपत्रीच राहणार की काय?

पुढारी वृत्तसेवा

Pusad Hardada highway road quality issues

उमरखेड : पुसद ते हरदडा या चौपदरी महामार्गाचे काम, हायवे अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र (HAM) नांदेड विभागामार्फत सुरू आहे. या महामार्गासाठी वापरले जाणारे तथाकथित “हायब्रिड इम्युनिटी तंत्रज्ञान” केवळ नावापुरतेच असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. वास्तविक सुरुवातीच्या टप्प्यात झालेले काम पाहता, प्रकल्पाचा मूळ उद्देश, तांत्रिक गुणवत्ता व आधुनिक मानके प्रत्यक्षात उतरतील की नाही, याबाबत गंभीर साशंकता निर्माण झाली आहे.

महामार्गाचे काम छत्रपती संभाजीनगर येथील एका कंपनीकडे असून एकूण २३० कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प राज्य शासनाने कर्जउभारणी करून राबवण्यास मंजूर केला आहे. उमरखेड शहरातील संजय गांधी चौक ते यूपीपी कॉलनी या महत्वाच्या भागातली कामे कंपनीने नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गतीने सुरू केली. सुरुवातीला आधुनिक तंत्रज्ञान, जड यंत्रसामग्री, उच्च दर्जाचे मिश्रण आणि दीर्घकालीन टिकाऊ रस्ता बांधण्याचा दावा मोठ्या जोमात करण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष काम पाहणाऱ्या नागरिकांना मात्र परिस्थिती वेगळीच दिसत आहे.

जमीन समतलीकरण, बेस लेयर, सब-बेस लेयर, ड्रेनेज मॅनेजमेंट आणि सुरक्षा उपाययोजना यांसारख्या मूलभूत टप्प्यांमध्येच घाई, अर्धवट प्रक्रिया आणि तांत्रिक नियमांचं पालन होत नसल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे “हायब्रिड इम्युनिटी तंत्रज्ञानाने मजबूत रस्ता” हा दावा फक्त कागदोपत्रीच राहणार की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि वाहनधारक यांनीही सुरू असलेल्या कामावर नाराजी व्यक्त केली असून “आधुनिक तंत्रज्ञानाचा आव आणून, प्रत्यक्षात जुनेच पद्धती वापरल्या जात आहेत. काही ठिकाणी साहित्याची गुणवत्ता व कामाची पातळी पाहता, हा चौपदरी रस्ता टिकाऊ होईल का?” अशी चर्चा सोशल मीडियासह शहरात सुरू आहे.

सदर कंपनीने कामाची वेळमर्यादा, गुणवत्ता नियंत्रण, स्वतंत्र तांत्रिक तपासणी आणि रस्त्याचे मानांकन याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नसल्याचे समोर येत आहे. शासनाने कोट्यवधींच्या खर्चातून कर्जउभारणीच्या हमीसह हाती घेतलेल्या या महत्वपूर्ण प्रकल्पात जर गुणवत्ता ढासळली, तर त्याचा फटका वर्षानुवर्षे नागरिकांना बसू शकतो.

दरम्यान, तज्ञांच्या मते उच्चस्तरीय काँक्रिट-डांबर मिश्रण, फायबर-रेइन्फोर्समेंट, जिओ-टेक्सटाईल, योग्य ग्रेडेशन, कंपॅक्शन आणि डिजिटल मॉनिटरिंग यांचा अचूक वापर केल्याशिवाय “हायब्रिड” दर्जाचा मार्ग तयार होत नाही. सद्यस्थितीत हे तांत्रिक निकष पाळले जात आहेत की नाही, हे अस्पष्टच आहे.

स्थानिय प्रशासनाकडून आणि हायवे प्राधिकरणाकडून कामाच्या नियमित तपासणीची मागणी आता अधिक जोर धरत आहे. महागडा चौपदरी रस्ता खरोखरच आधुनिक तंत्रज्ञानाचा नमुना ठरेल की फक्त नावापुरता ‘हायब्रिड’ ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT