चंद्रभान दादाराव कदम  Pudahri
नांदेड

Nanded Farmer Death | कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपविले

वारंगटाकळीतील घटनेने हळहळ; मृत्यूमागील कारणाचा पोलिसांकडून तपास

पुढारी वृत्तसेवा

Nanded Farmer Loan Waiver

हिमायतनगर : राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याचे काम सुरू असताना अनेक गावांमध्ये याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील शेतकरी चंद्रभान दादाराव कदम (वय ६०) यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) घडली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

माहितीनुसार, चंद्रभान कदम यांनी शेतातील आखाड्यावर ठेवलेले विषारी औषध प्राशन केले. ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कदम हे शेतीच्या कर्जामुळे आर्थिक अडचणीत होते. शासनाच्या कर्जमाफी योजनेत आपले नाव समाविष्ट व्हावे यासाठी त्यांनी अनेक वेळा बँकेच्या फेऱ्या मारल्या होत्या. मात्र अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी वारंगटाकळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस पाटील यांनी दिली.

चंद्रभान कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातू असा परिवार आहे. दरम्यान, संबंधित पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT