नांदेड

Nanded News : हदगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Nanded Hadgaon accident news

हदगाव, पुढारी वृत्तसेवा : हदगाव तालुक्यातील गोजेगावजवळ तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्‍या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्‍यू झाला. सुभाष धोंडिबा टिळक (वय ६०, रा. गोजेगाव) असे मृताचे नाव आहे. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

भरधाव अज्ञात वाहनाने उडवले

सुभाष टिळक कामानिमित्त उमरखेड येथे गेले होते. ते शनिवारी सायंकाळी खासगी वाहनाने पर गोजेगावकडे जाण्यासाठी प्रवासी निवाऱ्याजवळ उतरले.रस्ता ओलांडून गावाच्या दिशेने जात असतानाच भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. धडकेची तीव्रता एवढी होती की, वाहनाचे काही छोटे पार्ट तसेच साईड ग्लास घटनास्थळी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. वाहनाचा नोंदणी क्रमांक मिळू शकला नसल्याने वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

उड्डाणपुलावरील सर्व पथदिवे बंद

गोजेगाव जवळील या ठिकाणी उड्डाणपूल असून, मागील काही दिवसांपासून उड्डाणपुलावरील सर्व पथदिवे बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था बंद असतानाही संबंधित यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजूस गोजेगाव, तर पूर्व बाजूस प्रवासी निवारा आहे. प्रवासी निवाऱ्याजवळ उतरून गावाकडे जाण्यासाठी नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागतो. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने हा परिसर धोकादायक बनला आहे. त्यामुळे बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रकाशव्यवस्था सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तपासात पोलीस घेणार 'सीसीटीव्ही'ची मदत

घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. अपघातस्थळी अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करीत असून, या मार्गावरील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, या अपघातामुळे गोजेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, राष्ट्रीय महामार्गावरील अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT