

विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेडहून भोकरला जाण्यासाठी एस.टी. बसचे भाडे शंभर रुपयांवर गेले असल्यामुळे या मार्गावर खाजगी प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. अशा वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असून गुरुवारच्या भीषण दुर्घटनेनंतर अवैध वाहतुकीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आठवर गेली आहे. मृतांच्या कुटुंबीयांस पंतप्रधान कार्यालयाने प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली आहे.
गुरुवारी दूपारनंतर ग्रामीण भागात बैल पोळ्याचा सण साजरा होत असताना भोकर शहर व आसपासच्या भागांवर वरील भीषण अपघातामुळे शोककळा पसरली. अपघातग्रस्तांवर उपचार व तसेच इतर सोपस्कार रात्री उशिरापर्यंत चालले. या दुर्घटनेची माहिती मिळताच नांदेड मुक्कामी असलेले खा.अशोक चव्हाण तातडीने भोकरला गेल्यामुळे शासकीय यंत्रणा क्रियाशील झाली. खा.चव्हाण यांनी भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकार्यांना सूचनाही दिल्या.
वरील भीषण अपघातातील ‘महिंद्रा मॅक्झिमो’ (क्र.एम.एच.२६.एके.०५४८) वाहनातून १२ प्रवाशांची वाहतूक केली जात होती. त्यातील आठ जणांवर काळाने घाला घातल्यानंतर नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट मार्गावरील बेफाम खाजगी प्रवासी वाहतुकीवर महामार्ग सुरक्षा यंत्रणेचे अजिबात नियंत्रण नसल्याची बाब समोर आली. नांदेड-भोकर मार्गावर बारड येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र (चौकी) स्थापन करण्यात आलेले आहे; पण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणार्या वाहन चालक-मालकांवर गेल्या तीन वर्षात एकदाही कारवाई झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.
एस.टी. तसेच खाजगी बसगाड्यांचे भाडे परवडत नसल्यामुळे शेकडो प्रवासी वेगवेगळ्या छोट्या प्रवासी वाहनांतून वरील मार्गावर दररोज प्रवास करतात. वाहनचालकाने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले, तरी त्यास प्रवाशांकडून प्रतिबंध केला जात नाही आणि पोेलिसांकडूनही कारवाई होत नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी नांदेडहून निघालेल्या वरील अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांपैकी १२ पैकी आठ जणांना प्राण गमवावे लागले.
समोरून येणार्या ट्रक (एपी.२९.टीए.८१२९)च्या चालकाने सिताखांडी घाटातील वाकद शिवारात वरील प्रवासी वाहनास जोरदार धडक दिल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे उपचारादरम्यान मरण पावल्याचे भोकरच्या पोलिसांकडून सांगण्यात आले.
वरील अपघातातील पाच मृत प्रवासी भोकरचे, दोघे हिमायतनगर तालुक्यातील पोटा तांडा येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. एक जणाची ओळख अद्याप पटलेली नाही. इतर सात मृतांवर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. ट्रकचालक बासुमिया राजूमिया हाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातातील अन्य सात जखमींवरही उपचार करण्यात आले.
अपघातातील मृतांची नावे
बळीराम विनायक पवार व कृष्णा विनायक पवार (रा.पोटा तांडा ता.हिमायतनगर), पांडुरंग वाघमारे, लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे, शे.फिरोज शे.रमजान, स.अल्तमास स.अलीमोद्दीन, शाहीद सौदागर (सर्व जण रा.भोकर). एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील वरील दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी दुःख व्यक्त केले. प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांस पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे, तर जखमींना उपचारासाठी ५० हजारांची मदत देण्यात येणार आहे.