Upper Tehsildar Office Dhanki
उमरखेड : उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली असली, तरी कार्यालय प्रत्यक्षात कोणत्या तारखेपासून सुरू होणार, याबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. शासन निर्णय झाल्यानंतर कार्यालय तत्काळ सुरू होते, असे नसून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
महसूल विभागाने राज्यातील महसूल प्रशासनाचा नवीन आकृतिबंध निश्चित करताना ६९ नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी दिली होती. त्यानंतर २३ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यात ४७ नवीन अप्पर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याबाबत माहिती जाहीर करण्यात आली. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेंबाळ पिंप्री, तर उमरखेड तालुक्यात ढाणकी येथे कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे.
२ एप्रिल २०२६ रोजीच्या महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. लोकसंख्या, महसुली कामाचा व्याप, महसूल मंडळांची संख्या, भौगोलिक परिस्थिती आणि नागरिकांची सोय या बाबींचा विचार करून कार्यक्षेत्र निश्चित केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुख्यालय व हद्द निश्चित केल्यानंतर मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाते. प्राप्त हरकती-सूचनांचा विचार केल्यानंतर अंतिम प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर अंतिम अधिसूचना काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
विभाजनानंतर ढाणकी अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दराटी, निंगणूर, बिटरगाव आणि ढाणकी ही चार महसूल मंडळे, तर उमरखेड तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात उमरखेड, मुळावा, विडुळ, कुपटी आणि चातारी ही पाच महसूल मंडळे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अंतिम कार्यक्षेत्र अधिकृत अधिसूचनेनंतरच निश्चित होणार आहे.
नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांसाठी शासनाने स्वतंत्र प्रशासकीय आकृतिबंध निश्चित केला आहे. लहान अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी सात नियमित पदांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ढाणकी कार्यालयासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि इतर प्रशासकीय व्यवस्था पूर्ण करणेही आवश्यक आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व ४७ कार्यालये एकाच वेळी सुरू होणार नसून काही कार्यालयांचे कामकाज सुरू झाले आहे, तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ढाणकी कार्यालयाच्या प्रत्यक्ष उद्घाटनाची आणि कामकाज सुरू होण्याची तारीख पुढील प्रशासकीय आदेशानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
ढाणीसह परिसरातील नागरिकांना महसुली कामांसाठी उमरखेडला करावा लागणारा प्रवास कमी होणार असल्याने या कार्यालयामुळे प्रशासनाचे विकेंद्रीकरण होऊन वेळ व प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
ढाणकी येथे अद्याप कार्यालय नाही तात्पुरते कार्यालय तयार करावे लागेल. त्यानंतर शासन व जिल्हाधिकारी कार्यालय तिथे अधिकारी कर्मचारी नियुक्त करतील.- सखाराम मुळे, उपविभागीय अधिकारी, उमरखेड