Nanded News: नायगावात सरपंचपदाची दुसऱ्यांदा सोडत जाहीर, ४१ गावांत असणार ‘महिलाराज’

आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने नायगाव तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी (दि. २२) तहसील कार्यालयात दुसऱ्यांदा काढण्यात आली.
Naigaon gram panchayat election
Naigaon gram panchayat electionFile Photo
Published on
Updated on

Naigaon gram panchayat election

नायगाव : बाळासाहेब पांडे

आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने नायगाव तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी (दि. २२) तहसील कार्यालयात दुसऱ्यांदा काढण्यात आली. बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अजय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. या सोडतीनंतर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, तब्बल ४१ पदे महिलांसाठी राखीव झाली आहेत.

यापूर्वी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने फेरआरक्षणाची प्रक्रिया राबविण्याची वेळ आली. त्यानुसार २२ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात पुन्हा सोडत काढून ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले.

या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवरही या आरक्षणाचा परिणाम होण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येणार आहे.

अनुसूचित जातीसाठी १७ जागा

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आठ सरपंचपदे आरक्षित झाली आहेत. यामध्ये तलबीड, राजगडनगर, कोठाळा, पिंपळगाव, मुस्तापूर, गोदमगाव, सोमठाणा आणि खंडगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी मुंगाव, कहाळा बु., वंजारवाडी, चारवाडी, टाकळी त.ब., मरवाळी तांडा, खैरगाव, निळेगव्हाण आणि धुप्पा या नऊ ग्रामपंचायतींची निवड झाली आहे.

अनुसूचित जमातीसाठी चार जागा

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मरवाळी/कोपरा आणि रातोळी या दोन ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी होटाळा आणि रुई खुर्द या दोन ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : १९ जागा

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी नऊ सरपंचपदे आरक्षित झाली असून, कार्ला त.मा./माहेगाव, केदारवडगाव, ताकबिड, इज्जतगाव बु., बळेगाव, सांगवी, डोंगरगाव, ईकळमोर आणि पळसगाव/टाकळगाव यांचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी कुंटूर, ईकळीमाळ, शेळगाव छत्री, हिपरगा जा., सुजलेगाव, बरबडा, राहेर, नरसी, भोपाळा आणि टाकळी बु. या दहा ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

खुल्या प्रवर्गासाठी ४० जागा

खुल्या प्रवर्गासाठी २० सरपंचपदे आरक्षित झाली आहेत. यामध्ये टाकळी त.मा., धानोरा त.मा., सातेगाव, घुंगराळा, परडवाडी, कहाळा खुर्द, सालेगाव खु., कांडाळा, हंगरगा, लालवंडी, कोकलेगाव, कोलंबी, गडगा पाटोदा त.ज., मांजरम, कृष्णूर, मोकासदरा, बेटकबिलोली, देरेगाव आणि मनूर त.ब. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

खुल्या प्रवर्ग महिला आरक्षणात नरंगल, मांडणी, धनंज, नावंदी, रानसुगाव, वजीरगाव, अंतरगाव, अंचोली, बेंद्री, टेंभूर्णी, कुंचोली, गोळेगाव/नायगाववाडी, हुस्सा, आलुवडगाव, शेळगाव गौरी, मेंळगाव, रुई बु., देगाव, औराळा आणि सावरखेड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

४१ गावांत महिलांना संधी

आरक्षण सोडतीनंतर नायगाव तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यापैकी तब्बल ४१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये महिला उमेदवारांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. दुसऱ्यांदा झालेल्या आरक्षण सोडतीमुळे इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थांचे लक्ष आता निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेकडे लागले आहे.

आरक्षण जाहीर होताच गावागावांतील संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली असून, स्थानिक पातळीवर राजकीय मोर्चेबांधणीला वेग येण्याची चिन्हे आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आरक्षणाचे एकूण चित्र

एकूण ग्रामपंचायती : ८०

महिला आरक्षण : ४१

अनुसूचित जाती : १७

अनुसूचित जमाती : ४

नागरिकांचा मागास प्रवर्ग : १९

खुला प्रवर्ग : ४०

logo
Pudhari News
pudhari.news