नांदेड : जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मदतकार्य वेगाने सुरू असून लष्कराच्या जवानांनी उभारलेल्या वैद्यकीय व अन्न वितरण केंद्राचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे. सोमवारी (दि.18) रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने बचाव कार्याला वेग आला आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे गोदावरी, पैनगंगा, आसना या नद्यांना पूर आला. शिवाय लगतच्या जिल्ह्यातल्या कयाधू नदीला पूर आल्याने अनेक मार्ग बंद पडले. शिवाय अनेक गावांचा संपर्कही तुटला होता. रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने मुखेड तालुक्यात हाहाकार उडाला. अनेक जण पुराच्या पाण्यात अडकले होते. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, शिघ्रकृती दल, स्थानिक नागरिकांच्या मदतीने अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पुरामुळे मुखेड तालुक्यातल्या 9 ते 10 गावांना पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. एकाच रात्री होत्याचे नव्हते घडले. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या.
भारतीय लष्कराने मुखेड तालुक्यातील काही गावात वैद्यकीय आरोग्य केंद्र व अन्न वितरण केंद्र उभारल्याने त्याचा नागरिकांना ब-यापैकी दिलासा मिळाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोणत्याही महसुली मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली नाही. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरीही अनेक गावांना पुराचा धोका अजूनही कायम आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.
हिमायतनगर : तालुक्यातील पैनगंगा नदी काठावर असलेल्या सिरपली गावचा तिन दिवसांपासून संपर्क तुटला असून सद्यस्थितीत गावात ग्रामस्थांसह अबालवृद्ध तापीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत.
पैनगंगा नदी काठच्या गावांचा संपर्क तुटला असल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील गांजेगाव पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग चार दिवसांपासून बंद आहे तर नदी काठच्या गावकर्यांना घराबाहेर देखील पडता जमेना झाले आहे. ईसापूर धरणांचे दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीचा पूर वाढत आहे. कामारी, दिघी, घारापूर, सिरपली, डोल्हारी या नदी काठच्या गावांना पाण्याने घेराव घातला आहे.