नांदेड : नांदेडमधील एका अभियंत्याचा सेल्फी घेण्याच्या नादात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कंधार तालुक्यातील मन्याड नदीला असलेले पाणी पाहून अभियंत्याला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला नाही आणि त्याने सेल्फी घेताना त्याचा तोल गेल्याने आणि जीव गमावला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २६) सायंकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुखेड तालुक्यातील रावणकोळा गावचे रहिवासी असलेले अविनाश किशनराव हांडे (३४) हे अनुकंपा तत्वावर कंधार येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदी आठ महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. गुरुवारी सायंकाळी नांदेड येथून कामकाज आटोपून परत किवळा बहाद्दरपुरामार्गे उदगीरला जात असताना सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मन्याड नदीतील पाणी पाहून त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला.
नदीच्या पुलावरून सेल्फी घेतल्यावर सोबतच्या मित्राला मी पुलाच्या कठड्यावर बसतो, तू माझा फोटो काढ ! असे म्हणत ते कठड्यावर बसले, परंतु तोल जाऊन ते पाण्यात पडले. या घटेनेने घाबरलेल्या मित्राने लोकांच्या मदतीने अविनाशचा शोध सुरू केला. रात्री शोध लागला नाही. शुक्रवारी सकाळी हांडे यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत अविनाश हांडे यांच्या पश्चात पत्नी, १ वर्षाची मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, सेल्फीच्या नादाने जीव गमावलेल्या अभियंत्याच्या दुर्दैवी निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे