संतोष जोशी
नांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत येणाऱ्या नांदेड विभागात गाळप हंगाम जोरात सुरू झाला आहे. विभागातील 29 साखर कारखान्यांनी बुधवारी (दि. 17) अखेर 37 लाख 60 हजार 173 टन उसाचे गाळप पूर्ण केले असून, त्यातून 30 लाख 96 हजार 770 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा 8.1 टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नांदेड विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. गाळप हंगाम 2025-26 साठी विभागातील 30 कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी 29 कारखान्यांना गाळप परवाना मिळाला असून, या सर्व कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. यामध्ये 19 खासगी, तर 10 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी, ऊसतोड कामगार पहाटेपासून तोडणीच्या कामाला लागल्याने गाळपाला चांगली गती मिळाली आहे. नांदेड विभागात काही कारखाने गाळपात आघाडीवर आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील कानखेडा येथील बळीराजा साखर कारखाना, गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि., माखणी व सायखेडा येथील ट्वेण्टीवन शुगर्स लिमिटेड या तीन खासगी कारखान्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
मात्र, लातूर जिल्ह्यातील माळवटी येथील ट्वेण्टीवन शुगर्स लिमिटेड हा कारखाना विभागात सर्वाधिक आघाडीवर आहे. 29 कारखान्यांच्या तुलनेत या कारखान्याने पावणेतीन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप करून नंबर वन स्थान पटकावले आहे.
जिल्हानिहाय कारखान्यांची स्थिती
लातूर : विभागात सर्वाधिक 12 साखर कारखाने लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत. यात 6 खासगी व 6 सहकारी कारखान्यांचा समावेश आहे.
परभणी : जिल्ह्यात 6 कारखाने सुरू असून, हे सर्वच्या सर्व खासगी तत्त्वावर चालणारे कारखाने आहेत.
नांदेड : जिल्ह्यात 6 कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यात 5 खासगी तर केवळ 1 सहकारी साखर कारखाना आहे.
हिंगोली : जिल्ह्यात 5 साखर कारखाने सुरू झाले असून, यात 2 खासगी व 3 सहकारी कारखान्यांचा समावेश आहे.