Nanded DCCB recruitment pudhari photo
नांदेड

Nanded DCCB recruitment : जिल्हा बँक नोकरभरतीवरील स्थगिती अद्यापही कायम!

लातूर, परभणी बँकांतील प्रक्रिया पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : शेजारच्या परभणी आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पूर्ण झाली, तरी आता भाजपाच्या ताब्यात आलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीवरील स्थगिती अद्यापही कायम आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी आता बँकेच्या नव्या अध्यक्षांना प्रयत्न करावे लागतील, असे बँकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नांदेड बँकेमधील प्रस्तावित नोकरभरतीचा विषय गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान स्थानिक पातळीपासून शासनस्तरापर्यंत गाजला होता. नोकरभरती करण्यापूर्वी बिंदू नामावलीस (रोस्टर) शासनाची मान्यता न घेताच बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने एका त्रयस्थ संस्थेमार्फत भरती प्रक्रिया सुरू करताना त्यात प्रत्येक संचालकाचा हिस्सा (कोटा) निश्चित केल्याचेही समोर आले होते.

बँकेतील हे प्रकरण सर्वप्रथम दै.पुढारीने एका सविस्तर वृत्ताच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर सहकार खात्याने या बँकेतील नोकरभरती प्रकरणाची चौकशी सुरू केली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्रयस्थ संस्थेच्या निवडीतच चुकीच्या बाबी झाल्याचे दिसून आले होते. कालांतराने सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार विभागीय सह निबंधकांनी बँकेतील नोकरभरतीला गेल्या ऑक्टोबर महिन्यात स्थगिती दिली होती. नोकरभरतीच्या विषयात तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

बँकेचे वरील संचालक मंडळ सत्तारुढ असेपर्यंत नोकरभरतीवरील स्थगिती कायम ठेवण्यात भाजपा नेत्यांना यश मिळाले. आता या बँकेवर भाजपाची सत्ता आली आहे; पण त्यासोबतच नोकरभरतीच्या विषयात मागील मंडळातील जे संचालक थेट सहभागी होते ते किंवा त्यांचे प्रतिनिधी नव्या संचालक मंडळातही आल्यामुळे पुढील काळात होणारी नोकरभरती पारदर्शीपणे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेड बँकेतील नोकरभरतीचे प्रकरण गाजल्यानंतर शासनाच्या सहकार विभागाने पूर्वीच्या काही निर्णयांमध्ये बदल केले होते. नोकरभरती प्रक्रियेतील उमेदवारांची लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी पूर्वी सहा संस्थांना मान्यता देण्यात आली होती; पण नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये संस्था निवडीत गडबड झाल्यानंतर सहकार खात्याने आता केवळ तीन नामांकित संस्था निश्चित केल्या असून त्यांच्या मार्फतच परीक्षा घेणे अनिवार्य केले आहे. या संस्थांमध्ये आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल यांचा समावेश आहे. शेजारच्या परभणी बँकेने आयबीपीएस तर लातूर बँकेने टीसीएसमार्फत प्रक्रिया राबवून आपापल्या बँकांमधील नोकरभरती नुकतीच केली.

नांदेड बँकेच्या अध्यक्षपदी आता भाजपा आमदार डॉ.तुषार राठोड यांची निवड झाली आहे. ते मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात. डॉ.राठोड यांनी आठवडाभरापूर्वीच अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या कारकिर्दीतील संचालक मंडळाची पहिली सभा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. बँकेतील नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सहकारमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जाऊन या प्रक्रियेवरील स्थगिती मागे घेण्यासंबंधीचा आदेश मिळवावा लागणार आहे. त्याचवेळी बिंदू नामावली प्रस्तावासही मंजुरी आणावी लागणार आहे, असे बँकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT