

नांदेड : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नांदेड ग्रामीण आणि हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या पथकांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. गाडेगाव व कोतलवाडी शिवारात चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर ही कारवाई करण्यात आली असून, सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही कारवायांमध्ये मिळून सुमारे ६ लाख ३३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड जवळील गाडेगाव शिवारातील मोकळ्या जागेत मध्यरात्री 'तिर्रट' नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी ओमकार ज्ञानोबा कांबळे (वय १८), शिवहार उद्धव उबाळे (वय २७) आणि महेश शिवानंद उबाळे (वय १९, तिघेही रा. गाडेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून ५३ हजार रुपयांचे ३ मोबाईल, ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकल (MH-26-CD-8311, MH-26-BN-5892, MH-26-S-9690, MH-26-CF-9560, MH-26- AM-4792), रोकड १,९२० रुपये व पत्ते असा एकूण ४ लाख १४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत हदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोतलवाडी जाणारे रोडवर एका शेतातील आखाड्यावर 'झन्ना मन्ना' नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत विठ्ठल काशीनाथ नारखेडे (वय ४३), अरविंद मारुती सूर्यवंशी व विनायक नारखेडे (सर्व रा. खडकी) या तिघांना पकडण्यात आले, तर अन्य पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून १८,३४० रुपयांची रोकड, २ लाख रुपये किमतीच्या ४ मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा २ लाख १८ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हिमायतनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षकांचा इशारा..
नागरिकांनी जिल्ह्यातील अशा कोणत्याही अवैध जुगार, मटका किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तत्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे; बेकायदेशीर धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला आहे.