नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक pudhari photo
नांदेड

Nanded district bank election : नांदेड जिल्हा बँक निवडणुकीसाठी 1400 मतदार!

काही संस्थांकडून दोन नावे ः नायगावमध्ये सचिवांची स्वाक्षरी नसलेले 4 ठराव

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ (व्यवस्थापन समिती) निवडणुकीकरिता सहकार खात्याच्या तालुकास्तरीय यंत्रणेकडून तयार झालेली मतदारांची यादी जिल्हा उपनिबंधकांकडून बँक प्रशासनाकडे आली असून अ, ब, क अशा तीन मतदारसंघांमध्ये 1400 मतदारांची नावे आहेत. त्यात काही संस्थांनी दोन ठरावांद्वारे दोन नावे प्रस्तावित केली तर काही संस्थांच्या ठरावांवर सचिवांची स्वाक्षरी नाही!

बँकेच्या मतदार यादीसाठी सर्व सभासद संस्थांना आपल्या प्रतिनिधीचे नाव निश्चित करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा अवधी दिला गेला. या काळामध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये आपल्या सोयीचे मतदार असावेत, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून आले.

उमरी तालुक्यातील एका साखर आणि गुळसम्राट नेत्याने आपल्या गावच्या सेवा सहकारी सोसायटीच्या अनिष्ट तफावतीचे तब्बल 31 लाख रुपये भरून या सोसायटीच्या माध्यमातून आपले नाव यादीत आणतानाच तब्बल 28 सोसायट्यांतून आपल्या पसंतीचे प्रतिनिधी मतदार यादीमध्ये आणल्याची बाब समोर आली असून या नेत्याने मतदार यादीच्या प्रक्रियेमध्ये गोरठेकर गटाला निष्प्रभ केल्याचे सांगितले जात आहे.

अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तीन तालुक्यांत अ मतदारसंघाच्या (सेवा सहकारी सोसायटी) मतदारयादीवर खा. अशोक चव्हाण यांनी वरचष्मा राखला आहे. स्वतः चव्हाण अर्धापूर तालुक्यातून निवडणूक लढविण्याच्या तयारीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

नायगाव तालुक्यातील चार नेत्यांनी मतदार यादीच्या प्रक्रियेत लक्ष घातले. या तालुक्यातील चार सोसायट्यांचे ठराव सचिवांच्या स्वाक्षरीविना आले. तालुका सह निबंधकांनी तशी नोंदही केली; पण जिल्हा उपनिबंधकांनी वरील चारही ठरावांत आलेली नावे यादीमध्ये कायम ठेवली. त्यांत आ. राजेश पवार यांचेही नाव आहे. कंधार-लोहा तालुक्यांतून तीन सोसायट्यांकडून प्रत्येकी दोन नावे आली. त्यांतील अधिकृत मतदार कोण, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मतदारांची ही यादी एक-दोन दिवसांत विभागीय सह निबंधकांकडे सादर करण्यात येणार असून त्याची नोंद घेऊन ते प्रारूप मतदारयादी जाहीर करतील, असे सांगण्यात आले. नांदेड जिल्हा बँकेत मागील 10 वर्षे 21 लोकनियुक्त संचालक होते. आता संचालकांची संख्या 23 होणार आहे.

विद्यमान संचालकांमधील 08 संचालक बाद होणार असून त्यांच्या जागी नवे संचालक येणार, हे एव्हाना स्पष्ट झालेच आहे. त्याशिवाय आणखी काही नवे चेहरे बँकेमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

  • बिलोली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यांच्या मतदार यादीवर विद्यमान अध्यक्ष भास्करराव खतगावकर यांचा वरचष्मा आहे. खतगावकर यांना आता निवडणूक लढविता येणार नाही. त्यांच्या खतगाव सोसायटीकडून डॉ. मीनल पाटील यांचे नाव प्रस्तावित असून त्या स्वतः निवडणूक लढविणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT