Dial 112 Fake Call File Photo
नांदेड

Nanded Crime | दारूच्या नशेत ‘डायल ११२’ करणे पडले महागात; नायगाव पोलिसांकडून गुन्हा

पोलिसांची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याचा प्रकार

पुढारी वृत्तसेवा

Nanded Dial 112 Fake Call

नायगाव : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने पोलिसांची मदत मिळावी, यासाठी सुरू असलेल्या ‘डायल ११२’ या सेवेचा गैरवापर करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. दारूच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देऊन मदतीसाठी कॉल केल्याचा प्रकार नायगाव तालुक्यातील टाकळी येथे समोर आला. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

नायगाव पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई ज्ञानेश्वर पुणेईनवाड हे २८ सप्टेंबर रोजी दुपारी कर्तव्यावर होते. त्यावेळी दुपारी साडेतीनच्या सुमारास टाकळी येथील रावसाहेब दत्ता गायकवाड यांनी ‘डायल ११२’वर फोन करून आपण अडचणीत असल्याचे सांगितले. तसेच तातडीने पोलिसांची मदत मागितली.

कॉल मिळताच पोलिस शिपाई ज्ञानेश्वर पुणेईनवाड आणि पोलिस शिपाई शेखर यांनी विलंब न करता टाकळी गाठले. गावातील मारुती मंदिर परिसरात त्यांनी गायकवाड यांची भेट घेतली. पोलिसांनी त्यांना नेमकी काय अडचण आहे, याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही. त्यांच्या बोलण्यातून पोलिसांना संशय आला.

वैद्यकीय तपासणीत दारू प्यायल्याचे निष्पन्न

संशय बळावल्याने पोलिसांनी गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. कोणतीही प्रत्यक्ष अडचण नसताना दारूच्या नशेत ‘डायल ११२’वर कॉल करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे तपासात समोर आले.

यानंतर नायगाव पोलिसांनी रावसाहेब दत्ता गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.

आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर केल्यास कारवाई

‘डायल ११२’ ही आपत्कालीन सेवा असून, संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीने पोलिस मदत मिळावी, यासाठी ती कार्यरत आहे. त्यामुळे या सेवेवर खोटी माहिती देणे किंवा पोलिसांची दिशाभूल करणारे कॉल करणे गंभीर ठरू शकते. आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT