

नांदेड : जुन्या कौटुंबिक वैमनस्यातून आणि अनैतिक संबंधांवरून ३५ वर्षीय तरुणाची धारदार खंजीरने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कौठा भागात शुक्रवारी (दि.२५) रात्री घडली. नरेश बालाजी पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत मुख्य आरोपीसह तिघांना अवघ्या काही तासांत शिताफीने ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वसरणी येथील भाग्यश्री सोसायटीत राहणारा नरेश पवार (३५, व्यवसाय - पिकअप चालक) हा शुक्रवारी रात्री कौठा परिसरात आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास बसवेश्वरनगर भागातील एका चक्कीजवळ आरोपींनी त्याला गाठले. जुन्या वादाचा तीव्र राग मनात बाळगून आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून नरेशवर हल्ला चढवला.
राधेश्याम ऊर्फ लिंब्या, त्याचा चुलतभाऊ गजानन गोंदवड आणि रामेश्वर गोंदवड या तिघांनी नरेशच्या छातीवर, बरगडीवर आणि हातावर धारदार खंजीरने गंभीर वार केले व घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नरेशला त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी तत्काळ विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) सह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, बाबुराव चव्हाण, सायबर सेल व गुन्हे पथकाच्या अंमलदारांनी बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक रवींद्र तारू करत आहेत.
आरोपींना बेड्या
पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक गुप्तहेरांच्या मदतीने आरोपींचा माग काढत राधेश्याम ऊर्फ लिंब्या प्रल्हाद गोंदवड, गजानन घनश्याम गोंदवड, आणि रामेश्वर रमेश गोंदवड (सर्व रा. बसवेश्वरनगर, कौठा) या तिघांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्यांना बेड्या ठोकल्या.