महावितरणच्या कथित निष्क्रिय कारभाराविरोधात धर्माबादमध्ये नागरिकांचा संताप उफाळून आला.  Pudhari
नांदेड

Nanded Morcha | वीजखंडितविरोधात धर्माबादकरांचा संताप; महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा

‘वीज हक्काची, उपकाराची नाही’ आणि ‘सुरळीत वीजपुरवठा द्या’ अशा घोषणांनी शहर दणाणले

पुढारी वृत्तसेवा

Dharmabad Electricity Issue

धर्माबाद : वारंवार होणारी वीजखंडिती, तक्रारींची दखल न घेणे आणि महावितरणच्या कथित निष्क्रिय कारभाराविरोधात मंगळवारी (दि.९) धर्माबादमध्ये नागरिकांचा संताप उफाळून आला. ‘वीज हक्काची, उपकाराची नाही’ आणि ‘सुरळीत वीजपुरवठा द्या’ अशा घोषणांनी शहर दणाणून सोडत हजारो नागरिकांनी महावितरणविरोधात भव्य आक्रोश मोर्चा काढला.

पानसरे चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. व्यापारी, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत आंदोलकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी घोषणाबाजी करत नागरिकांनी वीजप्रश्नांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले.

किरकोळ पाऊस किंवा वाऱ्याची झुळूक आली तरी तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान, शेतकऱ्यांच्या कामांमध्ये अडथळे आणि रुग्णांची गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत असून संयमाचा अंत होत असल्याची भावना मोर्चादरम्यान व्यक्त करण्यात आली.

मोर्चानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. धर्माबाद, रत्नाळी आणि बाळापूर परिसरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र मंजूर करणे, वारंवार होणारी वीजखंडिती रोखणे, तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करणे तसेच निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

मोर्चाला संबोधित करताना वक्त्यांनी प्रशासनाला इशारा देत वीज ही नागरिकांची मूलभूत गरज असल्याचे अधोरेखित केले. जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख गणेश गीरी, माजी नगरसेवक संजय पवार, शिवराज पाटील चोळाखेकर, दत्तात्रय कावडे, सचिन रेड्डी चाकरोड, मारोती कागेरू, बालाजी बनसोडे, गणपत कात्रे, राजू शिरामणे, भगवान कांबळे, भुमेश कनकमवाड, अविनाश पिंगळे, वीरभद्र वारले, दीपक झाडे, कुलदीप मस्के, स्वामी आणि राजू चिंतावार यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सदाशिव भडिकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT