NDCC Bank pudhari photo
नांदेड

NDCC bank election : कार्यकर्त्यांना वनवास; नांदेड जिल्हा बँकेत येणार ‌‘वारसराज!‌’

नव्या दुरुस्तीमुळे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नसली, तरी त्यांच्यातील सात जणांनी बँकेच्या निवडणुकीसाठी घरातलाच प्रतिनिधी तयार केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

संजीव कुळकर्णी

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीमध्ये विद्यमान संचालकांतील आठ जणं बाद होणार आहेत. त्यांतील बहुसंख्य प्रस्थापित संचालकांनी आपल्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी तालुकास्तरीय कार्यकर्त्यास संधी देण्याऐवजी बँकेमध्ये ‌‘वारसराज‌’ आणण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.

बँकेचे विद्यमान अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर तसेच सर्वश्री मोहन पाटील टाकळीकर, आ.प्रताप पाटील चिखलीकर, दिनकर दहिफळे हे माजी अध्यक्ष, खा.नागेश पाटील आष्टीकर या प्रभावशाली नेत्यांसह अन्य तीन संचालकांना बँकिंग कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नसली, तरी त्यांच्यातील सात जणांनी बँकेच्या निवडणुकीसाठी घरातलाच प्रतिनिधी तयार केला आहे.

बँकेच्या मतदार यादीसाठीची महत्त्वाच्या प्रक्रियेची मुदत बुधवारी सायंकाळी संपल्यानंतर प्रारूप मतदार यादी अद्याप बाहेर आलेली नाही; पण आगामी निवडणुकीनंतर बँकेमध्ये अनेक नवे संचालक दाखल होतील, हे स्पष्ट झाले. वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपली जागा भरून काढण्यासाठी पत्नी, सून, मुलगी किंवा मुलगा अशा वारसांना बँकेच्या संचालक मंडळात आणण्याचे नियोजन केले आहे.

खतगावकरांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील बिलोली तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविणार, हे आधीच स्पष्ट झाले हेोते. आ.चिखलीकर यांनी स्वतःच्या व मुलगा प्रवीण पाटील याच्या जागी मुलगी आणि सून अशी जोडी निवडणुकीसाठी तयार केली आहे. खा.आष्टीकर आपल्या मुलाची वर्णी लावण्याच्या प्रयत्नात असून आष्टी सोसायटीतर्फे मतदारयादीसाठी त्यांच्या नावाचा ठराव झाला आहे.

नायगावच्या प्रभावशाली राजकीय घराण्यातील खा.रवींद्र चव्हाण हे बँकेचे विद्यमान संचालक आहेत; पण आता नायगाव तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून याच घराण्यातील श्रीनिवासराव पाटील घोड्यावर बसण्याच्या तयारीत आहेत. भोकर तालुक्यातील एका संचालकाने पत्नीच्या उमेदवारीची सोय करून ठेवली आहे, तर ज्येष्ठ संचालक मोहन पाटील टाकळीकर यांनी आपले पुत्र मुकेश पाटील टाकळीकर यांना बँकेत विराजमान करण्याचे ठरवले आहे.

विद्यमान संचालक गोविंदराव नागेलीकर हेही बाद होणाऱ्यांमध्ये असले, तरी मुदखेड तालुक्यात खा.अशोक चव्हाण गटातर्फे अन्य इच्छुकास संधी मिळण्याची शक्यता आहे. दहिफळे यांनीही आपल्या कुटुंबातील दोघांपैकी एकास बँकेमध्ये आणण्याचे नियोजन करून ठेवले आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळामध्ये तीन महिलांचा समावेश होता; पण आगामी निवडणुकीनंतर संचालक मंडळात महिलांची संख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे.

सविता मुसळेंना विश्रांती?

विद्यमान संचालकांपैकी राजेंद्र केशवे, शिवकुमार हरिहरराव भोसीकर, कैलास देशमुख गोरठेकर यांनी आपल्या वडलांचा वारसा चालवला. या तिघांनाही निवडणूक लढविण्याची संधी आहे. काही जुने आणि नवे अशांचे मिळून ‌‘वारसराज‌’ बँकेमध्ये दिसणार आहे. खा.अशोक चव्हाण गटाच्या विद्यमान संचालिका सविता रामचंद्र मुसळे यांना विश्रांती देऊन अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात चव्हाण गटातर्फे लक्ष्मण ठक्करवाड किंवा मुदखेडचे प्रवीण गायकवाड यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT