विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी चिखलीकर पिता-पुत्र हे दोघेही बाद होणार असल्यामुळे याच परिवारातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या प्रणिता देवरे-चिखलीकर यांचे नाव कंधार आणि लोहा या दोन तालुक्यांतील वेगवेगळ्या सेवा सहकारी संस्थांकडून मतदार यादीमध्ये आले आहे. त्यांचा हा ‘दुहेरी मुकुट’ संबंधितांत चर्चेचा विषय झाला आहे.
जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीकरिता अ, ब आणि क मतदारसंघातील वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींच्या नावांची प्रारूप मतदारयादी लातूरच्या विभागीय सह निबंधक कार्यालयाकडे मंगळवारी सादर करण्यात आली. प्रणिता देवरे यांचे नाव दोन वेगवेगळ्या तालुक्यांतून यादीमध्ये समाविष्ट झाल्याचे त्यानंतर समोर आले.
कंधार तालुक्यातील चिखली हे चिखलीकर परिवाराचे मूळ गाव. या गावातील सेवा सहकारी सोसायटीने प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्या नावाचा ठराव मतदार यादीसाठी सादर केला. तसेच लोहा तालुक्यातील वडेपुरी सेवा सहकारी सोसायटीनेही त्यांचेच नाव मतदार यादीसाठी पाठविल्याचे दिसून आले.
आ.प्रताप पाटील चिखलीकर व त्यांचे पुत्र प्रवीण यांच्या वरील बँकेवरील संचालक पदास 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे बँकिंग कायद्यातील नवीन तरतुदीनुसार दोघांनाही बँकेची निवडणूक लढविता येणार नाही; पण या दोघांची नावे मतदार यादीमध्ये आली आहेत. सोबतच आ.चिखलीकरांच्या कन्या प्रणिता देवरे यांना ‘अ’ मतदारसंघातील कंधार किंवा लोहा तालुक्यातून निवडणूक लढवता यावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
एकच व्यक्ती दोन सेवा सहकारी सोसायट्यांची सभासद राहू शकते का, याबाबत वेगवेगळी माहिती सांगण्यात आली; पण सहकार विभागातील एका अनुभवी अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, तशी अट किंवा तरतूद कायद्यात नसल्याचे स्पष्ट झाले. प्रणिता देवरे यांचे नाव दोन वेगवेगळ्या तालुक्यांच्या सोसायट्यांकडून आले असले, तरी त्यांना दोनपैकी एका संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून मतदान करता येईल, असेही सांगण्यात आले.
बँकेच्या 2021 ते 2026 दरम्यानच्या संचालक मंडळातील चार माजी अध्यक्षांसह अन्य चार माजी संचालकांनाही बँकेची निवडणूक लढविता येणार नाही. त्यांच्या जागी नवे संचालक बँकेमध्ये येणार, हेही आता स्पष्ट झाले आहे. वरील आठ जणांतील गोविंदराव शिंदे नागेलीकर वगळता इतरांनी बँकेच्या निवडणुकीसाठी आपले वारस (प्रतिनिधी) निवडणुकीच्या दृष्टीने तयार केले आहेत. प्रणिता देवरे-चिखलीकर तसेच खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील ही त्यांतील ठळक नावे. मोहन पाटील टाकळीकर, दिनकर दहिफळे या माजी अध्यक्षांनीही आपल्या घरातील प्रतिनिधीस निवडणुकीसाठी उभे करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे.
प्रारूप यादीत 1344 मतदार!
विभागीय सह निबंधकांकडे पाठविण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये ‘अ’ मतदारसंघात 930, ‘ब’ मतदारसंघासाठी 192 तर ‘क’ मतदारसंघात 222 मतदार आहेत. ही यादी येत्या एक-दोन दिवसांत जाहीर करून त्यांतील नावांवर हरकती नोंदविण्यासाठी संबंधितांना पुरेसा अवधी दिला जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. जून अखेरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज विभागीय सह निबंधकांनी वर्तविला.