

आटपाडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ मंदिरातील मुख्य गाभाऱ्यासमोरील नक्षीकामयुक्त खांबांवरील सुमारे २४ किलो चांदी अचानक गायब झाल्याने मोठा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देविखिंडी (ता. खानापूर) येथील शिवाजीराव विठ्ठलराव पाटील (वय ७५) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत विश्वस्तांवर गंभीर आरोप करत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, धर्मादाय आयुक्त, प्रांताधिकारी, आटपाडी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या अर्जानुसार, त्यांच्या वडिलांच्या नवसपूर्ती निमित्ताने सुमारे २५-३० वर्षांपूर्वी मंदिरातील गाभाऱ्यासमोरील दोन खांब व गजमुखद्वार पूर्णपणे चांदीच्या पत्र्याने मढवून सुशोभीकरण करण्यात आले होते. यासाठी अंदाजे २४ किलो शुद्ध चांदी वापरण्यात आली होती. हे काम तत्कालीन विश्वस्त व कारागिरांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले होते.
मात्र, काही महिन्यांपूर्वीच खांबावरील चांदीचा पत्रा उचकटल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत मंदिर प्रशासनाला माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर १८ जानेवारी २०२६ रोजी पाटील कुटुंबीय देवदर्शनासाठी गेले असता, दोन्ही खांबांवरील संपूर्ण चांदी व नक्षीकामयुक्त गजमुखद्वार गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
या संदर्भात विश्वस्तांकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट, “चांदी दुरुस्तीसाठी दिली आहे” असे सांगत वेळकाढूपणा करण्यात आला. विशेष म्हणजे, चांदी कोणाकडे दिली याची कोणतीही अधिकृत नोंद दाखवण्यात आली नाही. दाखवलेली कागदपत्रेही बनावट व संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. २९ डिसेंबर २०२५ च्या तारखेची दोन परस्परविरोधी पत्रे दाखवून चांदी वेगवेगळ्या व्यक्तींना दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या पत्रांवर कोणतीही सही, शिक्का किंवा नोंद क्रमांक नसल्याने प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे. याशिवाय, चांदी काढतानाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यासही टाळाटाळ करण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू होताच विश्वस्तांकडून समेटाचा प्रयत्न करण्यात आला. “चांदी परत आणतो” असे आश्वासन देत वेळ मागण्यात आला; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिकच बळावला आहे. या सर्व प्रकारामुळे मंदिर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भक्तांच्या भावनांशी खेळ झाल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. “देवासाठी अर्पण केलेली चांदी गायब होणे ही केवळ चोरी नसून श्रद्धेचा अपमान आहे,” अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. सदर प्रकरणात फसवणूक, विश्वासघात व अपहार झाल्याची दाट शक्यता व्यक्त करत, संबंधित चेअरमन, सचिव व सर्व विश्वस्तांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.