नांदेड ः प्रशासनाच्या उदासिनतेचा आणि गावगाड्यातील अनास्थेचा एक भीषण चेहरा नांदेडच्या लोहा तालुक्यातील दापशेड येथे समोर आला आहे. गावात हक्काची स्मशानभूमी नसल्याने कोळी समाजातील गुरुवारी एका मृत महिलेवल अंत्यसंस्कार करण्यात आले नाही.संतप्त नातेवाईकांनी मृतदेह चक्क ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन ठेवला आहे. गेल्या 30 तासांपासून हे आंदोलन सुरू असून, जोपर्यंत जागेचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यानंतर आता शुक्रवारी हा प्रश्न तात्पूरता मिटला असून, नातेवाईकांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले.
दापशेड गावात महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मात्र, या समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही. गुरुवारी दुपारी एक वाजता गंगाबाई धोंडीबा रेंचेवाड (वय 80) यांचे वृध्दापकाळामुळे निधन झाले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नसल्याने संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मृतदेह ग्रामपंचायतीत नेऊन ठेवला.
पावसाळ्यात किंवा इतर वेळी अंत्यविधी करताना ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार निवेदने देण्यात आली, मात्र प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच मिळाली.
अंत्यविधीसाठी जागा नसल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला. संतप्त नातेवाईकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तिथेच सरण रचून आंदोलन सुरू केले. एका बाजूला प्रशासन डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना, दुसऱ्या बाजूला माणसाला मरणानंतर हक्काची दोन फूट जमीनही मिळाली नसल्याने याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता . घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
खबरदारीचा उपाय म्हणून दापशेड गावात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता .ग्रामसेवक त्रिंबक मोहरे आणि महसूल विभागाचे अधिकारी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते मात्र, पोलीस पत्रकार आणि प्रतिष्ठीत नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
कायमस्वरूपी मार्ग कधी ?
पोलिस आणि प्रतिष्ठीत नागरिकांनी मध्यस्थी केली. त्यामुळे महिलेवर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार पारपडले, हा प्रश्न तात्पूरता मिटला असला तरी पर्यायी मार्ग कधी निघेल यांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
आम्ही अनेक वर्षांपासून जागेची मागणी करत आहोत, पण कोणीही आमचे ऐकत नाही. आज नाईलाजास्तव आम्हाला मृतदेह ग्रामपंचायतीत आणावा लागला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.“परशुराम रेचेवाड, मृत महिलेचा नातू