नांदेड

Nanded crime: ‘वंदे मातरम्’ अन् महाराष्ट्र गीताला दिली बगल; टीएचओ कार्यालयातील ध्वजारोहणावर आक्षेप

तक्रारदारांनी कार्यक्रमाची रूपरेषा, उपस्थिती नोंद, छायाचित्रे तसेच उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासण्याची मागणी केली आहे

पुढारी वृत्तसेवा

धर्माबाद : स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीतासोबत ‘वंदे मातरम्’ आणि महाराष्ट्र गीत घेण्यात आले नसल्याचा प्रकार धर्माबाद येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे केली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रगीत घेण्यात आले. मात्र, ‘वंदे मातरम्’ आणि महाराष्ट्र गीत घेण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. राष्ट्रीय सणाच्या शासकीय कार्यक्रमात शासनाच्या निर्देशांचे पालन करणे अपेक्षित असताना संबंधित कार्यालयाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे शासकीय कार्यक्रमाचे नियोजन व शासन निर्देशांची अंमलबजावणी याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कार्यक्रमासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धर्माबाद यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला असून, त्याच्या प्रती तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेत चौकशी केली जाते का आणि दोषी आढळल्यास कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

फोटो, व्हिडिओ तपासण्याची मागणी

तक्रारदारांनी कार्यक्रमाची रूपरेषा, उपस्थिती नोंद, छायाचित्रे तसेच उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासण्याची मागणी केली आहे. ‘वंदे मातरम्’ आणि महाराष्ट्र गीत घेण्यात आले नाहीत, त्यामागील कारणाचा संबंधितांकडून लेखी खुलासा घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून लागू सेवा नियमांनुसार योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार सुरेश घाळे, संजय कदम आणि गंगाधर गोणारकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT