काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडीकडे लक्ष pudhari photo
नांदेड

Nanded News : काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडीकडे लक्ष

पावडे, बेटमोगरेकर, सत्तार यांची गच्छंती अटळ!

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः जिल्हा काँग्रेसच्या संघटन बांधणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून नांदेड मुक्कामी असलेल्या पक्षनिरीक्षकांचा दौरा सोमवारी देगलूर-बिलोली मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मुलाखतीने समाप्त झाला. पक्षाचे दोन जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची गच्छंती अटळ असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले. नूतन जिल्हाध्यक्षांची निवड केंद्र स्तरावर आणि तालुकाध्यक्षांची निवड प्रदेशस्तरावरून होणार असल्याने संभाव्य निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अखिल भारतीय काँग्रेसच्यावतीने देशभरात संघटन सृजन अभियान सुरु करण्यात आले आहे.मजबूत संघटन बांधणी हा या अभियानाचा उद्देश आहे.पक्षाचे वरिष्ठ नेते वेणुगोपाल राव, रवींद्र दळवी यांच्यासह राज्यातील पक्षनिरीक्षक गेल्या 10 दिवसांपासून नांदेड मुक्कामी होते. इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेवून तीन जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पुर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

या दौऱ्यात वेणुगोपाल राव यांनी नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नांदेड शहर, नायगाव, देगलूर-बिलोली,मुखेड, कंधार-लोहा,किनवट-माहूर, हदगाव-हिमायतनगर, आणि भोकर मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संभाव्य जिल्हाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या तक्रारी व सूचनाही जाणून घेतल्या.

या दौऱ्यातील अहवाल तयार करून केंद्रीय समितीकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर होणार आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश पावडे (उत्तर), हणमंत पाटील बेटमोगरेकर (दक्षिण) आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याचे चित्र आहे.

नांदेड दक्षिणसाठी विठ्ठल पावडे, संदिपकुमार देशमुख, रेखा चव्हाण तर दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी रामदास पाटील सुमठाणकर, संजय शेळगावकर, डॉ.भगवान मनुरकर यांच्या नावाची चर्चा आहे. दोन जिल्हाध्यक्षपदांपैकी एक जिल्हाध्यक्ष ओबीसी गटातून निवडला जाईल, असेही संकेत आहेत.

प्रत्येकी सहा नावे

वेणुगोपाल राव यांनी आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित सोबत चर्चा केली. त्यानंतर दोन जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी सहा इच्छुकांची नावे नोंद केल्याची माहिती आहे.

  • मुदखेड तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वेणुगोपाल राव यांची भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, कैलास गोडसे यांच्यासह काही नगरसेवकांचाही समावेश होता. पक्ष बांधणीसाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची पक्षाला गरज असल्याचे यावेळी वेणुगोपाल राव यांनी कैलास गोडसे यांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT